रजनीकांत काय करणार?


तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांना आता उतरती कळा लागलेली आहे. तामिळनाडूचे राजकारण हे नेहमी व्यक्तीच्या भोवती फिरत असते. त्यामुळे अण्णादुराईपासून ते जयललितापर्यंत द्रमुक आणि अण्णाद्रमुकचे नेतृत्व नेहमीच एका नेत्याकडे राहिलेले आहे. विशेषतः चित्रपटाच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवलेल्या कलाकारांनी त्या लोकप्रियतेचा वापर करून राजकारणात आपले बस्तान बसवले आणि सत्ता मिळवली. तामिळनाडूतली जनता चित्रपट वेडी असल्यामुळे आणि त्यांचे व्यक्तीविषयीचे आकलन अतीशय वरवरचे आणि उथळ असल्यामुळे या जनतेने सामाजिक कार्य करणार्‍या नेत्याऐवजी चित्रपटातल्या अभिनेत्यांनाच नेते बनवले. एखादा अभिनेता चित्रपटात जी भूमिका करतो तसा तो प्रत्यक्ष आयुष्यात नसतो ही गोष्ट अगदी सामान्य माणसालासुध्दा कळू शकते. परंतु तामिळ जनतेच्या मोठ्या वर्गाला हे आकलन नसल्यामुळे हे लोकप्रिय अभिनेत्यांना चित्रपटातल्या भूमिकांप्रमाणेच समजायला लागतात आणि त्यामुळेच ते अभिनेते सहजपणे नेते होतात.

त्याचा परिणाम असा होतो की अभिनेत्यांची क्रेझ कमी झाली की नेतृत्वाची पोकळी तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे हे अभिनेते सामाजिक कार्याच्या पार्श्‍वभूमीतून पुढे आलेले नसल्यामुळे ते भ्रष्टाचाराला सहज बळी पडतात. द्रमुक नेते करूणानिधी आणि अद्रमुक नेत्या जयललिता हे दोघेही त्यामुळेच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले होते. तरीही लोक त्यांना मानत होते. आता मात्र जयललिता यांचे निधन झालेले आहे आणि करूणानिधी जवळपास ९५ वर्षांचे होऊन विकलांग झाल्यामुळे दोन्ही पक्षांपुढे नेतृत्वाचा पेचप्रसंग उभा आहे. करूणानिधी यांचा जागा घेईल असा नेता द्रमुक पक्षात नाही आणि जयललितांच्या पश्‍चात अद्रमुकमध्ये कोणीही करिश्माई नेता उरलेला नाही. नेतृत्वाच्या पातळीवर निर्माण झालेल्या या पोकळीचा फायदा घेऊन दक्षिणेतल्या या राज्यात आपले बस्तान बसवण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी सुरू केलेला आहे. आजवर तामिळनाडूत भाजपाला कधीही यश मिळालेले नाही. १९९८ साली भाजपा आणि अद्रमुक यांची युती झाली होती. त्यावेळी अद्रमुकच्या लोकप्रियतेचा फायदा मिळून भाजपाचे तीन खासदार तामिळनाडूतून निवडून आले होते. ती काही भाजपाची स्वतःची कमाई नव्हती. कारण एकदा हे यश मिळाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत भाजपाचा एखादा ग्रामपंचायत सदस्यसुध्दा निवडून आलेला नाही. तरीसुध्दा ही परिस्थिती बदलण्याचे चिकाटीचे प्रयत्न भाजपाचे नेते करत आहेत.

एखादा लोकप्रिय अभिनेता भाजपात आला आणि त्याने तामिळनाडूतील नेतृत्वाची पोकळी भरून काढली तर भाजपाचे बस्तान तामिळनाडूत बसू शकेल असा विश्‍वास भाजपा नेत्यांना वाटायला लागला आहे. तामिळनाडूतील चित्रपट अभिनेता रजनीकांत याच्यावर भाजपाने लक्ष केंद्रीत केले आहे. रजनीकांत याने राजकारणात प्रवेश करावा आणि भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणून तामिळनाडूत आपले स्थान निर्माण करावे अशी भाजपाची योजना आहे. तिला अजून रजनीकांत यांनी दुजोरा दिलेला नाही. परंतु त्यांच्या आतापर्यंतच्या हालचाली आणि विधाने यातून तसे संकेत मिळत आहेत. रजनीकांत यांचा राजकीय हिशोब तसा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यालासुध्दा देशभरातल्या भाजपाच्या लोकप्रियतेचा फायदा मिळणार आहे. रजनीकांतला भाजपाचा फायदा मिळेल आणि भाजपाला रजनीकांतचा फायदा मिळेल असे हे परस्पर फायद्याचे गणित आहे. तशा हालचाली सुरूही झालेल्या आहेत. येत्या एकदोन दिवसात रजनीकांत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणे अपेक्षित आहे. तिच्यात याच संबंधाने बोलणी होणार आहे.

अशा सगळ्या घटना घडत असतानाच मध्येच एक भाषिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. तामिळनाडूमधील काही तामिळ संघटनांनी रजनीकांत यांच्या घरासमोर निदर्शने करून त्यांच्या राजकारण प्रवेशाला विरोध केला आहे. रजनीकांत हे मुळात तामिळ नाहीत. त्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या राजकारणात पडू नये अशी या निदर्शने करणार्‍या संघटनांचे म्हणणे आहे. रजनीकांत यांना राजकारणाची झलक यातून दिसलेली आहे. अशा प्रकारच्या निदर्शनांचा विचार न करता त्यांना आपल्या भूमिकेवर ठाम रहावे लागणार आहे आणि अशा विपरित मागण्यांची दखल न घेता आपली वाटचाल जारी ठेवावी लागणार आहे. वास्तविक पाहता रजनीकांत हे मुळात कोण आहेत याचा राजकारणात काही संंबंध येत नाही. ते ४० वर्षांपासून तामिळनाडूत आहेत आणि तामिळनाडूतील लोकजीवनाशी एकरूप झालेले आहेत. ते कर्नाटकातील असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यांचे मूळ नाव शिवाजी गायकवाड असे आहे. म्हणजे ते मुळातले महाराष्ट्रातले कोल्हापूरचे. तिथून ते कर्नाटकात गेले आणि अगदी तरुण वयात चेन्नईला जाऊन तामिळनाडूचे झाले. यापूर्वी तामिळनाडूतल्या जनतेने ज्या जयललिता यांना अतोनात प्रेम दिले त्याही मुळातल्या कर्नाटकातल्याच होत्या हे रजनीकांत यांच्या घरासमोर आंदोलन करणार्‍या लोकांना कदाचित लक्षात नसेल किंवा लक्षात असले तरी काही वेगळ्याच कारणाने विरोध करून ते लोक भाषिक मुद्दा पुढे करत असावेत.

Leave a Comment