प्रश्‍न उत्पादकतेचा


शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर काल विधानसभेत झालेली चर्चा कशी मूळ मुद्याला सोडून होती हे सर्वांना समजले आहे. शेतकरी आणि शेती यांच्याशी संबंधित असलेल्या प्रश्‍नाच्या मुळाला हात घालायला कसे कोणीच तयार नाही याचाच अनुभव वरचेवर येत आहे. आपल्या देशातल्या शेतकर्‍यांची उत्पादकता हा सर्वात मुख्य आणि मूळ प्रश्‍न आहे. या संबंधात एक आकडेवारी समोर आली असून ती आपल्याला या प्रश्‍नाचे स्वरूप दाखवणारी आहे. भारतात २५ कोटी लोक शेतात राबतात पण अमेरिकेत २५ लाख लोकच शेतात राबतात. आपल्या देशातले २५ कोटी लोक आपल्या देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ १० टक्के एवढेच उत्पादन करतात. पण अमेरिकेतले त्यांच्यापेक्षा १०० पटीने कमी असलेले शेतकरी २५ कोटी भारतीय शेतकर्‍यांपेक्षा जास्त उत्पादन करतात.

याचा अर्थ असा आहे की, भारतीय शेतकरी ज्या प्रमाणात राबतो त्या प्रमाणात त्याचे उत्पादन होत नाही. म्हणजे त्याचे राबणे हे त्याच्या गरजा पूर्ण करण्याइतके उत्पन्न देणारे नसते. परिणामी तो गरीब राहतो. तेव्हा त्याच्या मालकीची शेती किती का असेना पण तिच्यात जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे. २५ कोटी लोकांना शेतीत काम मिळाले आहे. ते काही बेकार नाहीत. पण त्यांना मिळालेल्या कामातून मिळणारी मिळकत कमी आहे. यासाठी त्याला हक्काचे पाणी, वेळेवर कर्जपुरवठा, त्याच्या मालाला भाव या गोष्टी आवश्यक आहेत. हीच अवस्था अन्य म्हणजे कृषेतर रोजगारातही आहे.

आपल्या देशात रोजगार निर्मिती कमी होत असल्याची ओरड केली जात आहे पण अर्थतज्ञांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. त्यांच्या मते देशात रोजगाराची कमतरता नाही. पण ज्यांना ज्या नोकर्‍या मिळालेल्या आहेत त्यांना त्या नोकर्‍यांंत मिळणारे वेतन समाधानकारक नाही. या आधी लोक नोकर्‍या मागत असत आणि कोणतीही नोकरी द्या असे म्हणत असत. आता मात्र त्यांना नोकरी आहे पण त्यांची मागणी नोकरीची नाही. आता मिळते त्यापेक्षा अधिक वेतनाची आहे. याचे कारण असे की आपल्या देशातल्या नोकर्‍यांत चांगले वेतन मिळत नाही. अमेरिका आणि अन्य यूरोपीय देेशांच्याच नव्हे तर चीन आणि जपानच्याही नोकर्‍यात भारतापेक्षा अधिक वेतन मिळत असते. भारतात हे वेतन वाढले पाहिजे कारण भारताची अर्थव्यवस्था जगावर कमी आणि आपल्याच देशातल्या लोकांच्या मागणीवर अवलंबून आहे. लोकांची मागणी अर्थात क्रयशक्ती जशी वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढेल. म्हणून आपल्याला लोकांचे वेतन वाढवून देशात ८० कोटी मध्यमवर्गीय निर्माण केले पाहिजेत.

Leave a Comment