बळीराजा संपावर


देशातल्या शेतकर्‍यांची परिस्थिती वरचेवर खालावत चालली आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत ही गोष्ट खरी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या घसरत चाललेल्या राहणीमानाचे ते काही एकमेव द्योतक नाही. ज्या शेतकर्‍यांना ढासळत चाललेली परिस्थिती सावरणे अशक्य होऊन जाते ते शेतकरी निराश होऊन आत्महत्या करतात. मात्र करोडो शेतकरी खालावत चाललेल्या स्थितीत कसेबसे जगत राहतात. परिस्थिती खालावली म्हणून आत्महत्या करणे हा त्यावरचा मार्ग नाही असे ज्यांना वाटते ते लोक परिस्थितीशी झगडण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न म्हणून महाराष्ट्रातल्या काही शेतकरी संघटनांनी शेतकर्‍यांच्या संपाची कल्पना मांडली आहे. या संबंधात येत्या काही दिवसात औरंगाबाद येथे व्यापक बैठक होणार असून संप म्हणजे नेमके काय करणार याची रूपरेषा स्पष्ट होणार आहे. औद्योगिक कामगार करतात तसा संप शेतकर्‍यांना अपेक्षित नाही. कारण औद्योगिक कामगार संपावर गेले की उत्पादन बंद पाडतात. शेतकर्‍यांना तसे करता येत नाही.

शेतकरी हा काही कामगार नाही. तो स्वतः कष्टकरी तर आहेच पण तो आपल्या शेताचा मालकसुध्दा आहे. त्यामुळे या मालकाचा संप कष्टकरी कामगारापेक्षा वेगळा असणार हे काही सांगायला नको. अर्थात, शेतकरी नावाचा हा मालक जसा जगाचा अन्नदाता आहे तसाच तो स्वतःचाही अन्नदाता आहे. त्याला शेतात कष्ट केल्याशिवाय स्वतःच्या पोटापुरतेसुध्दा अन्न मिळत नाही. त्यामुळे त्याचा संप स्वतःपुरते धान्य पिकवणे हा असेल. शिवाय त्याचा संप शहरातल्या ग्राहकांच्या विरोधात असेल. हा शहरातला ग्राहक शेतातला माल स्वस्तात घ्यायला चटावलेला आहे. त्याची ही सवय घालवण्यासाठी संप केला जात आहे. कारण शहरात बसलेले हे शेतीमालाचे उपभोक्ते आपल्या उपभोगाच्या अन्य वस्तूंना जशी ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार दरवाढ मिळते तशी शेतकर्‍याला मिळणे मान्य करत नाहीत. आपण आता शेतीमाल वगळता अन्य मालाच्या किंमतीकडे पाहिले तर असे लक्षात येईल की सिनेमाच्या तिकिटापासून ते शाळा महाविद्यालयाच्या शुल्कापर्यंत प्रत्येक गोष्टीत गेल्या काही वर्षांत विशेषतः गेल्या २५ वर्षात अनेक पटींनी वाढ झालेली आहे. या वाढीमुळे शहरातली आर्थिक उलाढाल १९९१ पासून दुप्पट झालेली आहे आणि लोकांच्या दरडोई उत्पन्नात दुपटीपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. या वाढीमुळे त्यांच्या क्रयशक्तीत वाढ झाली असून तिच्यामुळे शहरात व्यवसाय करणार्‍यांचे उत्पन्नही प्रचंड वाढले आहे.

क्रयशक्ती वाढलेला हा शहरातला ग्राहक आपल्या अन्य गरजांसाठी जेवढे पैसे मोजत असतो तेवढे तो शेतीमालाला मोजायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढत नाही. आपल्याला लागणार्‍या अन्य वस्तू कितीही महाग झाल्या तरी चालतील परंतु भाज्या, फळे, दूध यांचे दर मात्र वाढता कामा नयेत असा या शहरी ग्राहकांचा अट्टाहास असतो. म्हणून सिनेमाचे तिकिट २५ रुपयांवरून २०० रुपयांवर गेले तर तो आरडाओरडा करत नाही. परंतु साखरेचे दर २५ रुपयांवरून ३० रुपयांवर गेले की मात्र त्याला ती साखर कडू वाटायला लागते. साखरेचे दर अन्य वस्तूंप्रमाणे वाढले नाहीत तर शेतकर्‍याच्या उसाला दर मिळत नाही आणि तो गरीब राहतो. याची या शहरातल्या ग्राहकांना कसलीच पर्वा नाही. उलट शेतकर्‍यांच्या समस्यांविषयी ते अधिकाधिक बेफिकीर आणि बोथट होत चालले आहेत. समाजात सध्या प्रत्येकजण स्वतःचाच विचार करायला लागला आहे. दुसर्‍यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याचाही आपण विचार केला पाहिजे ही भावना समाजातून कमी होत चालली आहे. या भावनेचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

शेतीमालाच्या किंमती कशा ठरवाव्यात आणि त्यांच्या किंमतीसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा की नाही हा वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकेल. परंतु शेतीमालाच्या किंमती ह्या त्यांच्या उपलब्धतेवरून ठरत असतात. गतवर्षी तुरीची दाळ कमी होती तेव्हा तिला २२५ रुपये भाव आला. मात्र यंदा तीच तूर मुबलक झाली आणि तिचा दर ५० रुपयांपर्यंत खाली कोसळला. ही किंमतीतली वाढ किंवा घट ही कोणत्याही स्वामीनाथनने ठरवलेली नाही. ती उपलब्धतेने ठरवली. उपलब्धता वाढली की किंमत कोसळली आणि उपलब्धता कमी झाली की किंमत वाढली. आता शेतकर्‍यांनी संप करताना आपला शेतीमाल मुबलकपणे उपलब्ध होत आहे असे चित्र निर्माण होऊ देऊ नये. संप करताना हा शेतकरी आता आपल्या गरजेपुरते पिकवणार आहे. म्हणजे तो शेत भरून सोयाबीन पेरणार नाही. आपल्या लागेल एवढी ज्वारी, तेवढेच गहू, आवश्यकते पुरत्या तेलबीया आणि गरजेची पिके तो घेईल. असे करताना त्याला शेतीचे नीट नियोजन करावे लागेल आणि नियोजन केल्याने बाजारात शेतीमालाची उपलब्धता मर्यादित होऊन त्याच्या शेतीमालाला भाव मिळण्यास ती स्थिती उपयुक्त ठरेल. तेव्हा संपाच्या निमित्ताने का होईना परंतु शेतकरी पिकांचे नियोजन करायला लागेल. सर्वांनी एकाच प्रकारचे पीक घेतल्यामुळे एरवी त्याची होणारी परवड टळायला मदत होणार आहे. तेव्हा शेतकर्‍यांनी जरूर संप करावा आणि संप हा शेतकर्‍यांच्या जीवनात निर्णायक बदल करणारा कसा ठरेल या सकारात्मकतेने विचार करावा.

Leave a Comment