तेजस एक्स्प्रेस


भारतीय रेल्वेच्या वेगात आणि सोयींमध्ये मोठे बदल करण्याचा चंग रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बाधला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मुंबई ते गोवा तेजस एक्स्प्रेस ही अती वेगवान गाडी सुरू करण्यात आली आहे. भारतामध्ये बुलेट ट्रेनचे युग आणण्याचा सरकारचा इरादा आहे. तशा बुलेट ट्रेन सुरू झाल्यास जपान, कोरिया आणि चीन यांच्या धर्तीवरील ताशी ३०० किलोमीटर वेगाच्या रेल्वेगाड्या सुरू होऊ शकतील. अर्थात ते युग भारतात सुरू होण्यास बराच अवधी आहे. मुळात मुंबई ते अहमदाबाद अशी सुरू होणारी पहिली बुलेट ट्रेन २०२० नंतर धावणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर अन्य मार्गांवरील बुलेट ट्रेन सुरू होतील. तशा त्या सुरू झाल्यानंतर त्यांच्या वेगाला टिकाव धरू शकतील असे रूळ अंथरावे लागतील आणि त्यातून नवा ट्रॅक निर्माण करावा लागेल.

त्याची वाट न बघता आता अस्तित्वात असलेल्या रूळांवरूनच जास्तीत जास्त किती वेगाने पळणार्‍या गाड्या सुरू करता येतील याचा अंदाज रेल्वेमंत्र्यांनी घेतला. तेव्हा त्यांना ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणार्‍या रेल्वेगाड्या आता सुरू करता येऊ शकतात असे लक्षात आले. त्यातूनच सध्याच्या वेगापेक्षा कितीतरी वेगाने पळणार्‍या आता सुरू होत आहेत. या पूर्वी वेगवान गाड्या म्हणून शताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु आता डब्यांची रचना बदलून त्यापेक्षाही वेगाने धावू शकणारी तेजस एक्स्प्रेस तयार करण्यात आली आहे. ही रेल्वे कमाल ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने पळू शकत असली तरी रूळांचा विचार करून ती ताशी १३० किलोमीटरच्या वेगाने पळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशी ही पहिली तेजस रेल्वे मुंबई ते गोवा या मार्गावर धावणार असून ती सर्वसोयींनी युक्त असणार आहे. या गाडीचे डबे तयार करण्यास साडेतीन कोटी रुपये प्रत्येक डब्यामागे असा खर्च आलेला आहे. ती तयार करून दिल्लीवरून मुंबईत आणण्यात आली. परंतु दिल्ली ते मुंबई या प्रवासात तिच्यावर काही समाजकंटकांनी दगडफेक करून काही डब्यांच्या काचा फोडल्या आहेत. देशात होणारी प्रगती आणि विकास ज्यांना देखवत नाहीत अशा लोकांकडून नेहमीच चांगल्या पावलांना असा अपशकून केला जातो. आता या दगडफेकीची चौकशी केली जाणार आहे. त्या चौकशी अंती जे दोषी आढळतील त्यांना कडक शासन झाले पाहिजे. मात्र या प्रकाराने रेल्वेच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा पुढे आला आहे.

Leave a Comment