आता बॅंकेतही मिळणार शंभर रुपयांचा स्टॅम्प


मुंबई- शंभर रुपयांच्या स्टॅम्प आता बॅंकेतही उपलब्ध होणार आहे. ई-एसबीटीआरद्वारे मुद्रांक शुल्क भरण्यासाठी किमान मर्यादा पाच हजार रुपयांवरून १०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर हा स्टॅम्प बॅंकेत मिळणार आहे.

मुद्रांक शुल्क, दस्तनोंदणी, नोंदणी शुल्क ऑनलाइनच्या माध्यमातून बॅंकांत भरण्याची सुविधा मुद्रांक शुल्क विभागाने यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी पाच हजार व त्यापुढील रकमेची मर्यादा या बॅंकांवर घालण्यात आली होती. परिणामी, पाच हजार रुपये व त्यापुढील कुठल्याही व्यवहारासाठी बॅंकेत ऑनलाइन पैसे भरल्यानंतर तेवढ्या रकमेचा स्टॅम्प पेपर ई-एसबीटीआरच्या माध्यमातून बॅंकांकडून उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे या सुविधेचा लाभ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर घेतला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाच हजारांच्या आतील रकमेचे मुद्रांक शुल्क भरण्यासाठीसुद्धा ई-एसटीबीटीआरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत होती.

कमिशनच्या विषयावरून बॅंक आणि मुद्रांक शुल्क विभाग यांच्यात वाद सुरू होता. त्या वादावर पडदा पडल्याने आता शंभर रुपये व त्यापुढील रकमेचा स्टॅम्प बॅंकेत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शंभर व त्यापुढील रक्‍कम ई-एसबीटीआरच्या माध्यमातून भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शंभर रुपयांच्या स्टॅम्पसाठी आता व्हेंडरकडे जाण्याची गरज राहणार नाही. बॅंकेत ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर ई-एसबीटीआरच्या माध्यमातून शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment