भारतातील सर्वात वेगवान ‘तेजस’ २२ मेपासून कोकण रेल्वेमार्गावर धावणार


नवी दिल्ली – २२ मेपासून कोकण रेल्वे मार्गावर देशाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली व गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली एखाद्या विमानाप्रमाणे अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशी ‘तेजस एक्स्प्रेस’ धावणार आहे. भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे मुंबई ते करमाळी (उत्तर गोवा) दरम्यान धावणार आहे. कोकण आणि गोव्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवास देणाऱ्या या एक्स्प्रेसचे भाडे राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या भाड्यापेक्षा अधिक असणार आहे.

शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गाडीची पाहणी केली. अनेक अतिरिक्त सुविधा या गाडीत देण्यात आल्यामुळे या गाडीचे प्रवास भाडे इतर गाड्यांपेक्षा जास्त ठेवण्यात आले आहे, असे प्रभू यांनी सांगितले. रेल्वेकडून सांगण्यात आले की, या गाडीच्या तिकीट दराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी दरपत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

तेजस एक्स्प्रेसचा ताशी वेग २०० कि.मी. आहे. मात्र रूळांची तेवढी क्षमता नसल्याने सध्या जास्तीत जास्त ताशी १३० कि.मी. वेगाने ही गाडी धावणार आहे. गाडीला सरकते दरवाजे असतील आणि त्याचे नियंत्रण गार्डकडे असेल. मेट्रोप्रमाण दरवाजे असणारी भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील ही पहिलीच एक्स्प्रेस ठरणार आहे. विमानाप्रमाणे या गाडीच्या प्रत्येक सीटच्या मागे एलसीडी स्क्रीन लावण्यात आलेल्या आहेत. ज्यावर प्रवासी मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहू शकतात. गाडीत वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. विमानातील हवाईसुंदरीच्या धर्तीवर या गाडीत अटेंडंट ठेवण्यात आले आहेत.

Leave a Comment