भडास कॅफेत मनोसोक्त करा तोडफोड


माणूस म्हटला की त्याला कधी ना कधी राग येतो. एखाद्यावेळी हा राग इतका अनावर झालेला असतो की समोर येईल ते तोडून मोडून टाकावे अशी इच्छा मनात येते. पण बहुतेक वेळ हे शक्य होत नाही व राग आतल्याआत गिळावा लागतो. इंदोरच्या चंद्रनगर भागात अशी मनसोक्त तोडफोड करून राग शांत करण्याची सोय करून दिली आहे भडास कॅफेने. येथे तुम्ही मनाला येईल ती तोडफोड करू शकता, तुम्हाला कुणी कांहीही म्हणणार नाही. राग शांत झाल्यामुळे तुम्ही तणावमुक्त झाल्याचा अनुभवही घेऊ शकता.

अतुल मलिकरामा नावाच्या युवकाने हा कॅफे सुरू केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार आमच्याकडे तुम्ही तुम्हाला हव्या त्या वस्तू खुशाल फोडा फक्त त्यासाठी तुम्हाला थोडा चार्ज भरावा लागतो. म्हणजे काचेचा ग्लास, फुगे यासारख्या वस्तूंसाठी दोन ते पाच रूपये, घड्याळे ५० रूपये, वगैरे. येथे राग काढण्यासाठी म्हणजेच फोडण्यासाठी टिव्ही, लॅपटॉप, पंचिग बॉक्स, संगणक, सीपीयू, कप, खुर्च्या, अश्या अनेक वस्तू आहेत. तुम्ही तोडफोड करताना रागाच्या भरात असता व त्यामुळे तुम्हालाही इजा होण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन येथे हेल्मेट, ग्लोव्हज, ट्रॅकसूटही तुम्हाला दिले जातात.


येथील भिंतींवर राग, द्वेष, किंचाळणे असले शब्द मोठमोठ्या अक्षरांत लिहिले गेले आहेत. राग शांत झाला की तुम्ही येथे कॉफीचा आस्वाद घेऊ शकता अथवा मेडिटेशनही करू शकता. देशात या प्रकारचे हे पहिलेच कॅफे असले तरी परदेशात अनेक ठिकाणी अशी कॅफे आहेत व त्यांना अँगर रूम्स असे नांव आहे. अमेरिकन टीन एजर डोना अलेक्झांडर हिला ही कल्पना प्रथम सुचली होती व आपल्या ऑफिसमधील सहकार्‍यांसाठी तिने अशी अँगर रूम तयार केली होती. त्यावेळी पाच डॉलर आकारून ती तोडफोड करायला परवानगी देत असे. आता तिने हा व्यवसाय म्हणूनच स्वीकारला आहे.

Leave a Comment