Skip links

साल्यांची सालपटे काढणार शेतकरी – उद्धव ठाकरे


नाशिक – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून माझी तळ पायाची आग मस्तकात गेली होती. पण आता शेतकरी रडणार नाही, साल्यांची सालपटे काढणार असा टोला दानवेंना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही. कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असे जाहीर आवाहनच करुन टाकले.

समाज आणि शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. विरोधात असताना मुख्यमंत्री कर्ज माफी मागायचे आणि आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही. मध्यावधीसाठी चाचपणी काय करत आहात.शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ असे उद्धव ठाकरे बोलले आहेत.

आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचे पुढे बघू अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला. समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन नको. मुंबई-नागपूर या दोन्ही राजधान्या जवळ याव्यात, पण शेतकऱ्यांचा सत्यानाश करुन नाही. समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवून नको असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा काय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंनी तूरीवर बोलताना तूर घोटाळा झाल्याचा आरोपही केला. सरकारने तूर घोटाळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असताना तूर आयात केली असा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करत विदेशातून काळा पैसा आणून देणार होते त्याचे काय झाले ? ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. शेतक-याला कर्जमुक्त करु नका, पण त्याच्या खात्यात स्विस बँकेतील १५ लाख आधी टाका अशी मागणी केली.

Web Title: Uddhav Thackeray aim on raosaheb danve