मातेने दिले मातृत्वाचे दान


पुण्याच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये काल जगातली एक अभूतपूर्व शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या द्वारा २१ वर्षांच्या महिलेच्या शरीरात गर्भाशयाचे रोपण करण्यात आले. विशेष म्हणजे तिला तिच्याच आईचे गर्भाशय देण्यात आलेे. शस्त्रक्रियेनंतर सारे काही सुरळीत झाले असून १२ तास सुरू असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता या मुलीला दिवस जाऊन बाळ झाले की या अवघड शस्त्रक्रियेचा हेतू सफल झाल्याचे समाधान सर्वांना मिळेल. अशा अवघड शस्त्रक्रिया भारतातही यशस्वीरित्या करता येतात हे सिद्ध झाल्याने आता जगात भारतातल्या वैद्यकीय उपचारांविषयीची विश्‍वासार्हता वाढायला मदत होईल. ही शस्त्रक्रिया करताना १२ डॉक्टर मदत करीत होते. त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

गर्भाशय मिळालेल्या मुलीच्या शरीरात गर्भाशयच नव्हते. त्यामुळे तिचे आई होण्याचे स्वप्न पुरे होत नव्हते. प्रत्येक महिलेला मूल होण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे वाटत असते. आपल्या मुलीतही कमतरता आहे हे कळल्यावर तिच्या आईने आपले गर्भाशय तिला देण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण ते तिच्या शरीरात रोपित करण्याची शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टर तयार झाले म्हणून या दानाला अर्थ आला. या प्रकरणात आपल्याला मूल व्हावे ही त्या मुलीची इच्छा तीव्र तर होतीच पण आपल्या त्यागातून तिचे आई होण्याचे स्वप्न पुरे व्हावे ही आईचीही इच्छा तितकीच तीव्र होती. या दोघींची इच्छाशक्ती तीव्र होती म्हणून शस्त्रक्रिया यशस्वी होण्यास मदत झाली असे शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी म्हटले त्यात अर्थ आहे. वैद्यकीय उपचारात औषधाइतकीच पेशंटची इच्छाशक्तीही उपकारक ठरत असते.

बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या एका कवितेत एका सासुरवाशिणीला सवाल केला आहे की ती सासरी नांदायला का जाते? ती उत्तर देते, आपल्या मुलीला माहेर मिळावे म्हणून ती नांदायला जाते. म्हणजे आपल्या मुलीला माहेर असावे म्हणून आई जाच करणारे सासर स्वीकारते. येथे आपल्या मुलीचे आई होण्याचे स्वप्न पुरे व्हावे म्हणून एका आईने आपले गर्भाशय तिला दिले आहे आणि तिला मूल व्हावे म्हणून आपल्या शरीरातला एक अवयव तिला दिला आहे. आजवर सरोगसीच्या प्रकारात आईने आपल्या मुलीचा गर्भ नऊ महिने आपल्या पोटात वाढवल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत पण या प्रकारात आईने आपले गर्भाशयच दिले आहे. आणि मानवतेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment