भुजबळांची बदनामी ?


सध्या कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. तुरुंगात भुजबळांना जादा सवलती मिळतात आणि त्यांना व्हीआयपी वागणूक दिली जाते अशी दमानिया यांची तक्रार होती. ही तक्रार त्यांनी काही जाहीरपणे केलेली नव्हती तर राज्याचे कारागृहाचे प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली होती. या तक्रारीचे स्वरूप, सरकारी कामातली एक त्रुटी दाखवून देणारा अर्ज असे असल्याने त्यातून आपली बदनामी झाली असे भूजबळांना म्हणता येत नाही पण त्यांनी तसे मानून दमानिया यांच्यावर ५० कोटी रुपये अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याबाबत आपल्या वकिलामार्फत नोटीस बजावली आहे.

जगात हास्यास्पद खटल्यांची काही जंत्री करण्याची परंपरा असेल तर तिच्यात या दाव्याचा आधी समावेश केला जाईल इतका तो हास्यास्पद आहे. असा काही खटला न्यायालयात दाखल करून घेतला जाईल की नाही या बाबतच शंका वाटते. या प्रकारात भुजबळ यांनी आधी खुलासा केला आहे. आपल्याला कसल्याही विशेष सवलती दिल्या जात नाहीत असे स्पष्ट केले आहे. खरे तर त्यांनी तसे स्पष्टीकरण करण्याची काहीही आवश्यकता नव्हती. दमानिया यांनी सरकारकडे तक्रार केली होती आणि जो काही खुलासा करायचा आहे तो सरकारने करायला हवा होता. पण या प्रकरणात भुजबळ यांनी उगाचच स्वत:ला झोकून दिले आहे आणि आता तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची नोटीस दिली आहे.

भुजबळांना एवढ्या किरकोळ आरोपाचा राग आला पण दमानिया यांनी त्यांच्यावर आजपर्यंत अनेक आरोप थेटपणे केेले आहेत. भुजबळांनी किती भ्रष्टाचार केला. किती हजार कोटी रुपयांची माया जमवली याचा भंडाफोड करणारे अनेक आरोप दमानिया यांनी जाहीरपणे लावले आहेत. असे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा भुजबळांना आपली बदनामी झाली असे कधी वाटले नाही. ते होत असतानाच्या काळात त्यांनी कधी दमानिया यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याची बुद्धी झाली नाही. आणि आता काही संबंध नसताना त्यांनी हे बेअब्रुचे प्रकरण स्वत:हून आपल्या अंगावर ओढून घेतले आहे आणि एका सरकारी अर्जावरून आपली बदनामी झाल्याचा कांगावा करून न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. कदाचित अशा काही दाव्याच्या निमित्ताने न्यायालयात जाण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर येण्याची संधी मिळेल अशी आशाही या दाव्यामागे असेल.

Leave a Comment