अरविंद केजरीवाल यांचा ‘हवाला’मध्येही सहभाग


नवी दिल्ली – पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी आरोपांची तोफ डागली आहे. केजरीवाल हे हवाला व्यापार करतात, असा गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

केजरीवाल यांच्यावर पत्रकार परिषदेत त्यांनी हल्लाबोल केला. तत्पूर्वी, केजरीवाल यांचा भंडाफोड ट्विट करून करणार असल्याचे मिश्रा यांनी म्हटले होते. या वेळी केजरीवाल हे काळा पैसा पांढरा करत असल्याचे त्यांनी म्हटले. अरविंद केजरीवाल आणि आपमधील इतर सदस्यांनी मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा शेअर केलेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. केजरीवाल आणि आपने मुकेशकुमारला हेमप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पुढे केले आहे. त्यांनी पक्षाला देणगी देणाऱ्या कंपन्यांचे लेटरहेड घरात तयार केले. सनव्हिजन कंपनीच्या लेटरहेडवरील सही मुकेशकुमार याची नव्हतीच. केजरीवाल आणि आपवर मी आरोप करत असल्यामुळे कदाचित माझी हत्याही होऊ शकते, अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली.

पक्षाला कोठून निधी मिळाला याची माहिती नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते. पण आता दोन कोटी रूपये निधी कुठून आला, याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले. महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी हा निधी आला होता. मुकेशकुमारने ज्या पक्षाला निधी दिला. त्यावेळी तो कंपनीमध्येही नव्हता. केजरीवाल यांनी मुकेशकुमारच्या दाव्याची प्राथमिक चौकशी केलीच नाही.

मिश्रा यांनी या कंपन्या बनावट असल्याचे म्हटले. मुकेश कुमार याचीही कंपनी बनावट आहे. एक व्हिडिओ यासंबंधी जारी केला आहे. मिश्रा म्हणाले, मुकेश दिवाळखोर आहे. त्याची इमारत सील करण्यात आली आहे. जो व्यक्ती व्हॅट देत नाही, कर देत नाही पण केजरीवाल यांच्या पक्षाला २ कोटी रूपये कसे देतो, असा सवाल उपस्थित केला. हा सरळसरळ सरकारी शक्तीचा दुरूपयोग आहे. ही कंपनी जानेवारी २०१४ मध्ये बंद होणे आवश्यक होते. पण ती अद्याप सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे ते म्हणाले.