नव्या प्रजातींचा शोध


या सृष्टीमध्ये किती प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आहेत यांची मोजदाद करणे खरेच अवघड आहे. कारण पृथ्वीच्या पाठीवरील काही प्रजाती शोधून त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. पण समुद्राच्या तळाशी गाळामध्ये रूतून असलेल्या किंवा निबिड अरण्यात लपून असलेल्या प्रजाती शोधणार कशा आणि त्यांचा अभ्यास करणार कसा असा प्रश्‍न आहे. तिथे मानवाच्या मर्यादा दिसून येतात. असे असले तरी शास्त्रज्ञांच्या मते दरवर्षी वनस्पती आणि प्राण्यांच्या जवळपास ५० हजार प्रजाती जन्माला येतात आणि तेवढ्याच नष्टही होतात. हा शेवटी अंदाज आहे. मात्र ज्या प्रजातींचचा शोध मानवाला लागतो त्यांच्या नोंदी करून, त्यांचा अभ्यास करण्याचे काम काही शास्त्रज्ञ करत असतात.

इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डन या संस्थेने मानवाला सापडलेल्या आणि अभ्यासाच्या कक्षेत आलेल्या नव्या प्रजातींची यादी केली आहे. त्यांच्या यादीनुसार २०१६ या एका वर्षात १७३० नवीन वनस्पती सापडल्या आहेत. निसर्गाची लीला फार अगाध आहे. त्यानुसार या प्रत्येक वनस्पतीचे स्वरूप वेगवेगळे आहे. त्यांच्या शरीराची रचना आणि विविध अवयवांमध्ये असलेल्या प्रथिनांचे स्वरूप यांची रचना हजारो प्रकारांची आहे. या प्रथिनांमधील रसायनांचा आणि त्यांच्या प्रमाणाचा प्रकार त्या वनस्पतीचा उपयोग काय होऊ शकतो हे दर्शवत असतो. ही प्रथिने तयार होण्याचे काम त्या वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या डीएनए वरून ठरत असते. तेव्हा त्या प्रजातींचा सविस्तर अभ्यास मानवासाठी उपयुक्त ठरत असतो.

सध्या मानवाच्या खाण्यात समाविष्ट असलेल्या प्रमुख वनस्पतींची संख्या २९ एवढी आहे. कमी अधिक प्रमाणात खाद्य म्हणून वापरल्या जाणार्‍या आणखीन काही छोट्यामोठ्या वनस्पतींची मोजदाद केली तर ही संख्या काही शे पर्यंत जाऊ शकते. परंतु यातल्या काही वनस्पती बदलत्या वातावरणानुसार कमी उत्पन्न द्यायला लागल्या आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्या वनस्पती नष्ट होत असतील किंवा त्यांचे उत्पादन कमी हात असेल तर त्यांना पर्याय शोधण्याची गरज आहे. तसा तो न शोधल्यास मानवाला आणि काही प्राण्यांनाही उपासमारीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यादृष्टीने नव्या वनस्पतींचा आणि त्यांच्या प्रजातींचा शोध हा आवश्यक ठरतो.

Leave a Comment