जनरल मोटर्स भारतात कार विक्री थांबविणार


अमेरिकन कार निर्माती कंपनी जनरल मोटर्सने या वर्षअखेर त्यांच्या कार्सची भारतात विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दोन दशके कंपनी भारतीय बाजारात त्यांचा हिस्सा वाढविण्यासाठी कसून प्रयत्न करते आहे. आजही त्यांचा भारतीय बाजारातील हिस्सा १ टक्क्याच्या वर जाऊ शकलेला नाही यामुळे कंपनीने त्यांच्या शेवर्ले ब्रांडची भारतीतील विक्री थांबविण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला आहे.

अर्थात कंपनी भारतीय बाजारात कार विकणार नसली तरी त्यांची भारतातून पूर्णपणे बाहेर पडण्याची इच्छा नाही. कारण बंगलोर येथील टेक सेंटर व पुण्याजवळ तळेगांव येथे असलेल्या कारखान्यात कार उत्पादन सुरू ठेवले जाणार आहे. या कारखान्यातून तयार होणार्‍या कार्स निर्यात केल्या जातील. प.गुजराथमधील कंपनीचा हलोल प्लांट चीनी जॉईंट व्हेंचर सेल मोटर्स कार्पोरेशनला विकला जाणार असल्याचे समजते. कंपनी भारतात उत्पादित केलेल्या कार्स सध्या मेक्सिको व लॅटीन अमेरिकेत निर्यात करत असून गेल्या वर्षात ३१ मार्चपर्यंत ७०,९६९ कार्स निर्यात केल्या गेल्या आहेत.तळेगांव कारखान्याची क्षमता वर्षाला १ लाख ३० हजार कार उत्पादन करण्याची आहे.

Leave a Comment