भूतानचा पारो विमानतळ, सुंदर तितकाच धोकादायक


भूतान हा आपला शेजारी देश. अनुपम निसर्गसौंदर्याने नटलेला हा देश पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. केवळ भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. हिमालयाच्या उत्तुंग बर्फाच्छादित पर्वतरांगात वसलेला हा शांत देश त्याच्या विमानतळामुळे अधिक चर्चेत आहे. येथील पारो विमानतळ अतिशय निसर्गरम्य ठिकाणी आहे मात्र विमाने उतरविण्यासाठी तो अत्यंत धोकादायक मानला जातो. जगातील कांही धोकादायक विमानतळात या विमानतळाची गणना केली जाते.

मोठी प्रवासी विमाने बनविणार्‍या बोईंग कंपनीने या विमानतळाची गणना जगातील सर्वात धोकादायक विमानतळात केली आहे. येथे विमान उतरविणे व उड्डाण करणे ही अतिशय कौशल्याची बाब आहे व त्यामुळेच जगात फक्त ८ पायलट या विमानतळावर लँडींग व टेकऑप साठी क्वालिफाय आहेत. हिमालयाच्या कुशीतील उंच पहाड, घनदाट वृक्षसंपदा, खड्या उंच पहाडांवर अधूनमधून बांधलेली घरे व लांबून नजरेत न येणारा रनवे ही या विमानतळाची खासियत. पहाडांतून कौशल्याने विमान चालवित असतानाच अचानकच हा रनवे समोर येतो व त्यामुळे विमान नियंत्रणात आणणे हा पायलटसाठी मोठा इव्हेंट असतो. या रनवेची लांबी फक्त ६५०० फूट असून जगातील छोट्या रनवेतील तो एक आहे.

येथे फक्त दिवसा व तेही हवामान स्वच्छ असेल तेव्हाच विमाने उतरू शकतात. वारा इतका जोरात असतो की विमानाचा तोल सांभाळणे पायलटसाठी मोठे आव्हान ठरते. अगदी क्वचित प्रसंगी रात्री विमान उतरविण्याची पाळी आलीच, तर भरपूर प्रकाशाची व्यवस्था केली जाते. व पायलटने मशीनवर नाही तर स्वतःच्या डोळ्यांवर भरोसा ठेवूनच विमान उतरवायचे असते.

Leave a Comment