Skip links

भारताची अण्वस्त्र क्षमता पाहून उडाली पाकिस्तानची झोप


इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव प्रकरणात सणसणीत चपराक मिळालेल्या पाकिस्तानने आता भारतावर अण्वस्त्र कार्यक्रमांवरुन आरोप केला आहे. भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम जगामध्ये वेगाने विकसित होत असून, २६०० अण्ववस्त्रांची निर्मिती करण्याची क्षमता भारताकडे असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाफीस झाकारीया म्हणाले.

त्यांनी हा आरोप इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. दक्षिण आशियाच्या स्थैर्याला भारताच्या अणवस्त्र संपन्नतेच्या महत्वकांक्षेमुळे धोका असल्याचे त्यांनी सांगितले. नागरी अणूऊर्जा कार्यक्रमातंर्गत भारताला अणू इंधन, उपकरणे आणि जे तंत्रज्ञान मिळत आहे त्याचा गैरवापर होण्याची भिती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. भारताला अणू पुरवठादार देश एनएसजी गटाचे कायमस्वरुपी सदस्यत्व हवे आहे त्यावरही पाकिस्तानला आक्षेप आहे.

भारताला एलिट गटामध्ये सदस्यत्व दिल्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकतात त्याचा जागतिक समुदायाने विचार करावा असे नाफीस झाकारीया म्हणाले. भारताने काही दिवसांपूर्वी अणवस्त्रांचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. पाकिस्तानकडून वापर होऊ शकतो असे वाटले तर, भारतच पहिला अणवस्त्रांचा वापर करेल असे संकेत भारताने दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने आता अशा स्वरुपाचे विधान केले आहे.