जीएसटीच्या दरांची निश्चिती


श्रीनगर: टेलिकॉम, इन्शुअरन्स, हॉटेल्स आणि रेस्टोरंटस प्रकारच्या सेवांसाठी चार टप्प्यातील वस्तू आणि सेवा कारणाचे दर सरकारने निश्चित केले असून १ जुलैपासून ते लागू करण्यात येतील; अशी माहिती जीएसटी समितीच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. जीएसटी लागू झाल्याने महागाईत वाढ होणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

जीएसटी अंतर्गत ५, १२, १८ आणि २८ टक्के दराने कर आकारणी केली जाणार आहे. टेलिकॉम आणि अर्थ विषयक सेवांसाठी १८ टक्के; तर वाहतूक सेवेसाठी ५ टक्क्यांनी कर आकारला जाणार आहे. केंद्रीय आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या समितीने १२०० सेवा आणि वस्तूंवरील कराचा दार निश्चित केला आहे. यामध्ये काही राज्यांनी केलेल्या विशिष्ट सेवा व वस्तू कमी दर आकारणीच्या टप्प्यात ठेवण्याच्या मागण्याही विचारात घेण्यात आल्या आहेत.

अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंपैकी ५० टक्क्यांहून अधिक वस्तू कराच्या कक्षेतून वगळण्यात आल्याने जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर महागाईमध्ये वाढ होण्याची भीती निरर्थक आहे; असा दावा अर्थमंत्र्यांनी यावेळी केला. धान्य, अंडी आणि मांस यांना कराच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे; तर तयार खाद्यपदार्थांवर १२ आणि २८ टक्के कर आकारणी केली जाणार आहे.

जीएसटीची अंमलबजावणी हे स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने उचललेले एक क्रांतिकारक पाऊल आहे. जीएसटीमुळे केंद्र आणि राज्याचे अनेक कर रद्द होणार असून संपूर्ण देश ही समान दरांची एक बाजारपेठ बनविण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.