व्हीआयपी कैदी


केन्द्र सरकारने देशातले व्हीआयपी कल्चर बंद करण्यासाठी लाल दिव्याच्या गाड्या बंद केल्या आहेत पण अजूनही हे कल्चर देशातल्या अनेक कारागृहांत सुरूच आहे. काही तुरुंगांत काही राजकीय वजन असलेल्या कच्च्या वा पक्क्या कैद्यांना व्हीआयपी वागणूक दिली जाते अशा तक्रारी येत असतात. बिहारात हा प्रकार फार चालतो. तिथे अनेक बाहुबली तुरुंगात आहेत आणि होते. पण त्यांना तो तुरुंग म्हणजे शिक्षा न वाटता आपले घरच वाटावे अशा सोयी त्यांना उपलब्ध करूऩ दिल्या जातात अशा अनेक तक्रारी येत असत. काही कैदी तर एरवी आपल्या घरात चालणारा दरबार तुरुंगातच भरवत असत. नंतर या तक्रारी वाढत गेल्या आणि पोलीस अधिकार्‍यांनी अशा कैद्यांचे मोबाईल फोन जप्त केले. त्यांचे सारे व्यवहार बंद पाडले.

अशी वागणूक मिळणारे कैदी हे समाजातली पैसेवाली धेेंडे असतात. त्यांच्याकडे पैशाला काही तोटा नसतो. तेव्हा आपला तुरुंगवास सुखाचा व्हावा यासाठी ते काही लाखच काय पण कोटी रुपये खर्चायला तयार असतात. एवढा पैसा तिथल्या कनिष्ठ तुरुंगाधिकार्‍यांनी कधी स्वप्नातही पाहिलेला नसतो. त्याच्या आशिर्वादाने या कैद्यांना सार्‍या सुखसोयी मिळतात आणि अधिकारीही एवढा सोप्या कामाच्या मोबदल्यात मालामाल होतो. म्हणून असे प्रकार सर्वत्र सुरू असतात. आता छगन भुजबळ यांच्याविषयी असाच प्रकार उघड झाला आहे. ते तसे कच्चे कैदी आहेत. त्यामुळे त्यांना पूर्णपणे कैद्यासारखी वागणूक कायद्याने देता येत नाही. काही बाबतीत त्यांना मोकळीक असते पण तिचा फारच गैरफायदा घेतला जात आहे.

भुजबळांना तुरुंगात त्यांच्या आवडीचे आणि तुरूंगात अपेक्षित नसलेले चमचमित पदार्थ पुरवले जातात अशी तक्रार अंजली दमानिया यांनी केली आहे. समीर भुजबळही त्यांच्यासोबत आहेत. त्यांना नारळाच्या पाण्याच्या बहाण्याने मद्य पुरवले जाते असे दमानिया यांनी म्हटले आहे. अशा प्रकारांकडे अधिकारी कानाडोळा करीत आहेत. दमानिया यांच्या या आरोपाची चौकशी करण्यात येणार आहे. भुजबळ असोत की अन्य कोणी वजनदार कैदी असोत त्यांना अशी वागणूक मिळतच असते. असे कैदी आजारी पडल्याचे सोंग आणूून तुरुंगाच्या ऐवजी रुग्णालयात मुक्काम करतात. भुजबळ यांनीही असा प्रयत्न सुरूवातीला केला होता पण याबाबत न्यायालयाने कडक भूमिका घेतली. आता त्यांच्यावर पुन्हा आरोप होत आहेत.

Leave a Comment