उत्तर प्रदेशातली घाण


स्वच्छ शहरे आणि स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेने उत्तर प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर एक नवेच आव्हान उभे राहिले आहे. या स्पर्धांत उत्तर प्रदेशातली रेल्वे स्थानके आणि शहरे यांनी तळाचे क्रमांक पटकावले आहेत. आता आदित्यनाथ यांना अनेक आव्हानांबरोबरच स्वच्छतेचेही आव्हान स्वीकारावे लागेल आणि अन्य क्षेत्रात ज्या तडफेने कामे केली आहेत त्याच तडफेने स्वच्छतेबाबत काम करावे लागेल. स्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली. ४३४ शहरांची पाहणी करून ही यादी आणि क्रमवारी जाहीर करण्यात आली होती. तिच्यात विशाखापटणम हे शहर तिसर्‍या क्रमांकावर आहे. याच शहराच्या रेल्वे स्थानकाने देशातले सर्वात स्वच्छ स्थानक असा मान मिळवला आहे.

स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर आणि भोपाळ या मध्य प्रदेशातल्याच दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकावले. मात्र सर्वेक्षण करण्यात आलेल्या शहरात उत्तर प्रदेशातले गोेंडा हे शहर सर्वात अस्वच्छ शहर ठरले. या यादीत खालून पहिले कोेण आहेत याचा शोध घेतला असता सर्वात अस्वच्छ ठरलेल्या १० गावांत पाच गावे एकट्या उत्तर प्रदेशातली असल्याचे दिसून आले. गोंडा, हर्दोई, बहारिच, शहाजहानपूर आणि खुर्जा ही ती घाण शहरे आहेत. रेल्वे स्थानकांच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती आहे. वाराणसीच्या गंगेप्रमाणेच स्थानकही घाण आहे. त्याचा ७५ गर्दीच्या स्थानकांत ३४ वा क्रमांक आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना आता आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवत उत्तर प्रदेशाची ही बदनामी पुसून टाकावी लागणार आहे.

सर्वाधिक स्वच्छ स्थानकांत महाराष्ट्राला फार काही मिळाले नाही. विशाखापटणम या स्पर्धेत पहिले आले. पहिल्या दहा स्थानकांत नवव्या क्रमांकावर पुण्याची वर्णी लागली. केवळ एकाच स्थानकाने हा मान मिळवला त्यामुळे महाराष्ट्रात नाराजी व्यक्त करण्यात आली पण स्पर्धेच्या तपशीलात गेल्यावर आणखी एक दिलासा मिळाला. पुण्याचा क्रमांक सर्वात गर्दीच्या ७५ स्थानकांत आला आहे. गर्दीची स्थानके ए -१ दर्जाची समजली जातात. पण त्या नंतरच्या ए दर्जाच्या कमी गर्दीच्या स्थानकांत अहमदनगर स्थानकाचा क्रमांक लागला आहे. देशात आठ हजार स्थानके आहेत आणि त्यातल्या ४०७ स्थानकांचीच पाहणी स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात येत असते. आता रेल्वेने स्वच्छ गाड्यांचीही स्पर्धा घेण्याचे ठरवले असून त्यासाठी निवडक २०० गाड्यांची पाहणी करण्यात येणार आहे.

Leave a Comment