
बंगळुरू – आयफोनचे भारतात तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल ‘द एसई’ची चाचणी या महिन्याच्या सुरुवातीला घेण्यात आली. आपल्या बंगळूरू येथील प्रकल्पात ही चाचणी तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मेड इन इंडिया आयफोन ग्राहकांच्या हातात पडण्याची शक्यता आहे.
मेड इन इंडिया आयफोन लवकरच ग्राहकांच्या हाती
बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे तैवानची विस्ट्रन कंपनी व्यवस्थापन करणार आहे. बंगळुरु येथे आयफोन एसई या मॉडेलच्या जोडणीचे काम सुरू झाले असून आठवडाभरात या प्रकल्पातील उत्पादने भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना देशात निर्मिलेल्या आयफोनचे मॉडेल वापरण्याचा आनंद घेता येणार आहे.
भारतात हा फोन अॅसेम्बल झाल्याने त्याची किंमतही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली तरीही भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या भारतीय रिसेलर्सकडून या मॉडेलची ३२० डॉलरला विक्री केली जाते. पण कंपनीने या किंमतीपेक्षा किमान १०० डॉलरने स्वस्त असावी अशी इच्छा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
