या मंदिरात मुस्लीम महिलेची हिंदूंकडून होते पूजा


गुजराथच्या अहमदाबाद जवळ असलेल्या झुलासन या छोट्याशा गावात डोलामाता मंदिर आहे. याचे वैशिष्ठ म्हणजे येथे मंदिरात मूर्ती नाही तर तेथे पुजली जाते ती गावाचे रक्षण करणारी बहादूर मुस्लीम महिला डोला हिची शिळा. गेली अडीचशे वर्षे या मंदिरात हिंदू भाविक डोलाची आराधना करत आहेत.

असे सांगतात की अडीचशे वर्षांपूर्वी या गावावर कांही लुटारूंनी हल्ला केला तेव्हा डोला नावाची ही मुस्लीम महिला पुढे सरसावली आणि तिने जीवावर उदार होत हल्लेखोरांशी सामना केला त्यात तिच्या देहाची आहुती पडली. अर्थात गावाचे रक्षण झाले पण डोला शेवटचा श्यास घेत होती तेव्हा तिचे शरीर फुलामध्ये परिवर्तित झाले. हे पाहून गावकरी चकीत झाले व गावकर्‍यांनी तिचे स्मरण व श्रद्धांजली म्हणून हे मंदिर उभारले. येथे डोला मातेची मूर्ती नाही तर शिळेवर एक यंत्र कोरले गेले आहे. त्याला साडी नेसवून पूजा अर्चा केली जाते. भाविकांची अशी गाढ श्रद्धा आहे की डोलामातेच्या दर्शनासाठी येणार्‍यांची इच्छा माता पूर्ण करते.

या गावात आजही डोला माता अदृष्य स्वरूपात वावरत असल्याची गावकर्‍यांची श्रद्धा आहे. अमेरिकेच्या नासाकडून अंतराळात गेलेली भारतीय वंशाची सुनिता विल्यम्स हिच्या वडिलांचे हे गांव. सुनीता अंतराळातून सुखरूप परत यावी यासाठी गावकर्‍यांनी डोलामातेची प्रार्थना करून मंदिरात चार महिने अखंड दीप तेवता ठेवला होता. सुनिताने तिच्या भारत भेटीत या गावाला व मंदिराला भेट दिली होती.

Leave a Comment