बढता भारत


भारत सरकारने काल आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षात स्वत:च्या ताकदीवर १० अणुउर्जा संयंत्री बसवण्याचे ठरवले आहे. ही सर्व संयंत्रं ६७० मेगा वॉट क्षमतेची असून त्यांच्यामुळे भारताच्या अणुउर्जा निर्मितीत ६७०० मेगा वॉट इतकी भर पडणार आहे. अणुऊर्जा ही सर्वात स्वच्छ वीज समजली जातेेे. त्यामुळे आपण कमीत कमीच नाही तर नाममात्र प्रदूषण करून आपल्या वीज निर्मिती क्षमतेेत भरीव वाढ करण्याकडे एक दमदार पाऊल टाकले आहे. भारताने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात किती भरारी मारली आहे हे आपण पहातच आहोत. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून आपण जगाला स्तिमित करून टाकले आहे. आता आपण उपग्रह प्रक्षेपणाच्या मार्केटमध्ये पदार्पण केले आहे. भारताचे प्रक्षेपण सुरक्षित तर आहेच पण स्वस्तही आहे त्यामुळे या प्रक्षेपाणाच्या मार्केटमध्ये आपली मक्तेदारीही निर्माण होण्याची शक्यता आहे. आता आपण अशाच रितीने अणुऊर्जा संयंत्रे विकसित करण्याच्या क्षेत्रातही हळुच पाऊल टाकले आहे. आगामी काळात आपण अनेक देशांत अशी संयंत्रे बसवून देऊ शकतो.

ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात जलविद्युत हा सर्वात स्वस्त प्रकार मानला जातो कारण या प्रकारात पाण्याच्या साह्याने जनित्रे फिरविली जातात आणि असलाही खर्च न करता वीज तयार होते. सुरूवातीचे काही खर्च निघून गेल्यानंतर ही वीज अनेक वर्षे मोफत तयार होत राहते. म्हणून वीज निर्माण करायचेच असेल तर जलविद्युत तयार करण्यावरच भर दिला पाहिजे पण या प्रकाराला मर्यादा आहेत कारण बारा महिने तेवढे पाणी उपलब्ध होणे शक्य होत नाही. त्यामानाने अणुऊर्जाही स्वस्त असायला हवी पण आपण या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहोत. जगात जपान, रशिया, अमेरिका आणि फ्रान्स हेच देश प्रामुख्याने या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण आजवर याच देशांकडून अणुऊर्जा प्रकल्प विकत घेत आलो आहोत. याही देशांनी ते प्रकल्प उभारताना भरपूर नफा घेतला असल्याने त्यातली वीज आपल्याला महाग पडत होती पण आता आपणच हे प्रकल्प साकार करणार असल्याने ते स्वस्त पडतील आणि पूर्वीपेक्षा कमी दरात ही वीज उपलब्ध होईल. आपल्या शास्त्रज्ञांनी या संयंत्रांच्या निर्मितीत मोठे यश मिळवले आहे त्यामुळे आपले सरकार मेक इन इंडिया योजनेखाली त्यांना प्रोत्साहन देत आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मेक इन इंडियाचे अनेक फायदे अनेक वेळा सांगितले आहेत. याही कामात असे अनेक फायदे दिसत असून त्यांचाही विचार केन्द्रीय मंत्रिमंडळाने केला आहे.

या दहा संयंत्रांना ७०हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. परदेशातून संयंत्रे घेतली असती तर त्यापेक्षा अधिक पैसे लागले असते. आज अणुऊर्जा निर्मितीचा खर्च एका मेगावॉटला १२ ते १३ कोटी रुपये एवढा झाला आहे पण आपण आपलेच संयंत्र बसवत असल्याने हा खर्च दर मे. वॉटला केवळ १० कोटी रुपये एवढाच येणार आहे. त्याशिवाय आपण या रूपाने स्वावलंबनाकडे पाऊल टाकणार आहोत. या कामांत ३३ हजारावर लोकांना रोजगार मिळणार तर आहेच पण आपल्या देशाच्या या नव्या उद्योगाचा पाया घातला जाणार आहे. त्यातून आपल्याला अब्जावधी डॉलर्सचे परकीय चलन मिळणार आहे. आपण तेव्हा जगातल्या अणुऊर्जा संयंत्री तयार करणार्‍या पहिल्या पाच देशांत समाविष्ट होणार आहोत. अर्थात या सगळ्या गोष्टी म्हणाव्या तेवढ्या सोप्या नाहीत. आपण या निमित्ताने अमेरिका,रशिया, जपान आणि फ्रान्स यांचे मार्केट आपल्याकडे ओढून घेत आहोत. त्यामुळे भारताच्या या दहा संयंत्रांच्या कामात हे देश अडथळे आणणारच नाहीत असे काही सांगता येत नाही. त्यातल्या त्यात युरेनियम हे इंधन मिळण्यात या देशांचे अनेक अडथळे येणार आहेत.

या सगळया अडचणींवर मात करून आपण पुढे जाणार आहोत यात काही शंका नाही. कारण १९७४ साली आपण पहिली अणुचाचणी केली तेव्हा जगातल्या सर्व देशांनी आपल्या नाड्या आवळायला सुरूवात केली होती. त्यांच्या या दबावावर मात करून आपण अणुऊर्जा विषयक कार्यक्रमावर ठाम राहिलो आणि आता संंयंत्रे बसवण्याच्या कामात आघाडीवर आलो आहोत. सध्या जगात अणुऊर्जा तयार करण्यासाठी युरेनियम वापरले जाते. भारत त्याबाबतीत स्वावलंबी नाही. तसा तो होऊ शकतो पण त्यातही अडचणी आहेत. भारतात युरेनियमचे ४४ हजार टन एवढे साठे आहेत पण आपले शास्त्रज्ञ थोरियमपासून अणुऊर्जा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते साध्यही होत आहे. थोरियम हे द्रव्य काही युरेनियमप्रमाणे खाणीतून काढायचे नाही. ते आपल्या देशातल्या विविध ठिकाणच्या समुद्र किनार्‍यांवरील वाळूत विपुलतेेने सापडतेे. आपल्या देशात ते ५ लाख १८ हजार टन एवढे उपलब्ध आहे. आपल्याला त्यापासून वीज तयार करण्यात यश येईल तेव्हा सार्‍या जगाचे मार्केट आपण काबीज करू शकतो. कच्चा माल आपल्याकडे आहे आणि आपल्या शास्त्रज्ञांनी त्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवण्याकडे वेगाने वाटचाल सुरू केलेली आहे. आपण जशी अवकाश संशोधनात भरारी घेतली आहे तशीच भरारी आपण थोरियम पासून अणुऊर्जा तयार करण्याच्या क्षेत्रात मारू शकतो. येणारा काळ भारताचा आहे.

Leave a Comment