मोठे मासे गळाला


माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम् यांच्याशी संबंधित कार्यालये तसेच त्यांची निवासस्थाने यावर धाडी टाकण्यात आल्या असून त्यांच्याविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अजूनही खुद्द पी. चिदंबरम् हे कशात सापडलेले नाहीत. परंतु या निमित्ताने ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्या पाहिल्या असता कार्ती चिदंबरम् यांच्या चुकीच्या अर्थव्यवहारासाठी पी. चिदंबरम् यांच्या अर्थमंत्री पदाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुुळे या सार्‍या कारवाईपासून पी. चिदंबरम् दूर राहतील अशी शक्यता नाही. ही कारवाई झाल्यानंतर चिदंबरम् यांनी नेहमीप्रमाणेच हे सरकार विरोधकांचा सूड घेत आहे असे आकांडतांडव केलेच. पी. चिदंबरम् सध्या एका इंग्रजी दैनिकात साप्ताहिक स्तंभ चालवत असून त्यातून नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयावर टीकेचे प्रहार करत आहेत. खरे म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात चिदंबरम् यांच्याशिवायही अनेक स्तंभलेखक लिखाण करत आहेत. परंतु त्यातल्या कोणत्याही पत्रकारावर मोदी सरकारने आपल्या विरोधात लिखाण केले म्हणून सुडाची कारवाई केलेली नाही.

पी. चिदंबरम् हे मात्र आपण मोदींच्या विरोधात लिखाण करतो म्हणून आपल्यावर खटले भरले जात आहेत आणि आपल्याला नमवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा प्रत्यारोप करत आहेत. अर्थात, कोणालाही आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याबद्दल अटक झाली तर अटक होणारा आरोपी आपल्याला झालेली अटक योग्य आहे असे कधीच म्हणत नाही. आपल्यावर खोटे आरोप लावले आहेत, आपण विरोधात आहेत म्हणून आरोप लावले आहेत, आपण एका विशिष्ट जातीचे आहेत म्हणून आरोप लावले आहेत असा कांगावा तो करतच असतो. मात्र लोकांनी लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की चिदंबरम् यांच्यावर झालेली कारवाई योग्यच आहे. कारण त्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण आज नव्हे तर ५-६ वर्षांपासून चर्चिले गेलेले आहे. एकदा चिदंबरम् हे केंद्रीय गृहमंत्री होते आणि त्याचवेळी आज राष्ट्रपती असलेले प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते. एकेदिवशी प्रणव मुखर्जी आपल्या कार्यालयात आले असताना त्यांना सर्वत्र काही छोटी छोटी उपकरणे लावलेली दिसून आली. या प्रकाराचा त्यांनी छडा लावला. तेव्हा ही उपकरणे प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयात हेरगिरी करण्यासाठी म्हणून तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी म्हणजे पी. चिदंबरम् यांनी लावायला लावली असावीत असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते आणि त्यांनी पी. चिदंबरम् यांच्या काही आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली होती. त्यांची कुणकुण चिदंबरम् यांना लागली आणि त्यांनी प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयातील हालचाली टिपण्यासाठी ती उपकरणे मुखर्जींच्या कार्यालयात लावली होती. म्हणजे पी. चिदंबरम् यांनी आपल्या मुलावर आणि अप्रत्यक्षपणे आपल्यावर कारवाई सुरू झाल्यानंतर, आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत आणि केवळ आपल्यावर सूड घ्यायचा म्हणून ही कारवाई होत आहे अशी केलेली आदळआपट म्हणावी तेवढी खरी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सीबीआय किंवा अन्य संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारे धाडी पडतात तेव्हा त्या मनमानी पध्दतीने टाकता येत नाहीत. त्याला न्यायालयाची अनुमती आणि दुजोरा लागतो. न्यायालये काही सरकारच्या ऐकण्यात नाहीत. तेव्हा एखाद्या नेत्यावर कारवाई झाल्यानंतर ती सत्ताधारी पक्षाच्या चिथावणीने झाली असे म्हणण्यात काही अर्थ नसतो. सध्याच्या परिस्थितीत तरी केवळ सत्ताधारी पक्षाची इच्छा आहे म्हणून कोणावरही मनमानी धाडी टाकता येत नाहीत.

सध्या आपल्या देशामध्ये अनेक नेते अशा काळ्या व्यवहारामुळे अडचणीत आले आहेत. याच नेत्यांनी नोटाबंदीनंतर बरेच आकांडतांडव केलेले होते आणि नोटाबंदीने काळा पैसा बाहेर येणे शक्य नाही असे म्हणत सरकारच्या या निर्णयाविरुध्द बरीच निवेदने केलेली होती. सरकार जरी काळा पैसा काढण्याचा आव आणत असले तरी काळा पैसा निघणे शक्य नाही असा या लोकांचा प्रचाराचा मुद्दा होता. परंतु सरकारने निर्धाराने कारवाई करायला सुरूवात करताच याच नेत्यांच्या घरामध्ये काळा पैसा सापडायला लागला आहे. लालूप्रसाद यादव यांच्याही मागे आयकर खात्याचा आणि अंमलबजावणी खात्याचा ससेमिरा लागला आहे. त्यांनीही आपली मुले आणि मुली यांच्या नावाने बरीच बेनामी मालमत्ता खरेदी केली असल्याचे प्रकरण उघड झाले आहे आणि सरकारने आता काळ्या पैशाच्या मागोमाग बेनामी मालमत्तांवरही कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे लालूप्रसादांची ही मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाच्या तावडीत सापडली आहे. त्यांनीही चिदंबरम् यांच्या प्रमाणेच कांगावा करायला सुरूवात केली आहे असा कांगावा करण्याऐवजी छातीठोकपणे आपण भ्रष्टाचारी नाही असे सांगणे हे त्यांचे काम आहे परंतु तशी खात्री ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवरच सुडाचा आरोप करून ते आपला भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment