तमीळनाडूतील चिदंबरम नटराज मंदिर


भारतात शिवमंदिरांची संख्या मोजता येण्यापलिकडे आहे. मात्र तमीळनाडूच्या चिदंबरम येथील चिदंबरम नटराज मंदिर हे शिवालय अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. महादेवाच्या प्रमुख मंदिरात त्याची गणना केली जाते. यात शिवाची नटराज मूर्ती असून शिवाने आनंदाच्या मूडमध्ये याच जागी नृत्य केले होते असाही समज आहे. अन्य शिवमंदिरात शिव लिंगस्वरूपात असतात अथवा मूर्ती असली तरी ती दागदागिन्यांनी मढलेली नसते. कारण शिव हा स्मशानात राहणारा देव मानला जातो. नटराज मंदिरातील मूर्ती अतिशय सुंदर व दागदागिन्यांनी मढलेली आहे. भारतात अशा मूर्ती फारच कमी प्रमाणात आढळतात.

या मंदिराचे बांधकामही अतिशय वैशिष्ठपूर्ण आहे. १०,६,००० चौरस मीटर परिसरात त्याची व्याप्ती आहे. या मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या प्रत्येक दगडात व खांबात शिवमूर्ती कोरल्या गेल्या आहेत. भरतनाट्यमच्या मुद्रातील या मूर्ती असून मंदिराला नऊ दरवाजे आहेत. मंदिर परिसरात गोविंदराज पंदरीगा मंदिरेही आहेत. देशात शिव आणि विष्णु यांची मंदिरे एकाच संकुलात असलेली फार थोडी मंदिरे आहेत त्यातील हे एक आहे. हे मंदिर प्राचीन अ्रसून येथे नटराजाचा रथही आहे. वर्षातून दोन वेळा होत असलेल्या मोठ्या उत्सवात हा रथ भाविक खेचतात. पाच मोठी सभागारेही येथे आहेत.

या मंदिराची अशी कथा सांगितली जाते की पार्वती व शंकर यांच्यामध्ये नृत्याची स्पर्धा लागली तेव्हा गोविंद राजास्वामी यांना शंकरानी परिक्षक होण्याची विनंती केली ती त्यांनी मान्य केली. मात्र पार्वती हरेना तेव्हा शंकारांनी गोविंद राजास्वामी यांनाच जिंकण्यासाठी काय युक्ती करावी हे विचारले तेव्हा त्यांनी एक पाऊल वर उचलून एकाच पायावर नृत्य करण्याची कल्पना सांगितली. महिलांसाठी नृत्यात वर्ज मानली गेलेली ही पोझ म्हणजेच नटराज पोझ. शंकरांनी ही पोझ घेतल्यावर पार्वतीने हार मान्य केली व त्यानंतर महादेवांची येथे नटराज रूपातच स्थापना केली गेली.

Leave a Comment