एमटीडीसी करणार कृषी पर्यटनाचा प्रसार


मुंबई: शेतकऱ्यांना कृषिमालासह उत्पन्नाचे अतिरिक्त साधन उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून कृषी पर्यटनाचा प्रसार केला जाणत आहे. त्या दृष्टीने एमटीडीसीने ‘महाभ्रमण योजना’ हाती घेतली आहे. ही योजना एक प्रायोगिक पर्यटन योजना असून या द्वारे शेतकऱ्यांची जीवनशैली अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळते. पेरणी, फळे व भाज्या खुडणे, बैलगाडीचा प्रवास इत्यादी अनुभव देण्यात येतात.

कृषी सहली आयोजित करणाऱ्या आयोजकांच्या गरजा पुरविण्यासाठी पर्यटन विभागाच्यामार्फत सरकारी यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे. ही यंत्रणा विभागीय/स्थानिक/संबंधित प्रशासकीय मंडळांशी समन्वय साधून दुवा म्हणून काम करेल, जेणेकरून कृषी क्षेत्रातील रोजगार संधी आणि शाश्वतता वाढेल.

राष्ट्राचा विकास, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास कृषी पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकतो, हे निश्चित आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजविल्यानंतर समोर आलेल्या परिणामांवरून हे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील ग्रामीण भागांना भेट दिल्यानंतर कृषी पर्यटन क्षेत्रात असलेली प्रचंड क्षमता दिसून आल्यावर स्थानिक यंत्रणांकडून मिळणारे सहकार्य, सरकारी परवानग्या/सवलती यांचे नियमन करणे अत्यावश्यक आहे. कारण हे घटक कृषी पर्यटनाच्या वाढीसाठी पूरक ठरणार आहेत.

Leave a Comment