मोदी सरकारची तीन वर्षे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सूत्रे गेली त्याला आज तीन वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात या सरकारने नेमके काय केले याचा लेखाजोखा मांडण्याची ही नक्कीच योग्य वेळ आहे. कारण आपल्या देशामध्ये सातत्याने निवडणुका होत असतात आणि या निवडणुका कोण जिंकणार यावर हिरीरीने चर्चा होत असते. २०१९ सालची लोकसभा निवडणूक आता दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे परंतु ही निवडणूक कोण जिंकणार या विषयी कोणाच्याही मनात शंका नाही. साधारणतः निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना सारा देश आणि राजकीय पक्ष निवडणुकीच्या मूडमध्ये येतात. अजून तसा मूड आलेला नाही. पण तरीही नरेंद्र मोदी यांचे विरोधकसुध्दा, २०१९ ची लोकसभा निवडणूक मोदीच जिंकणार अशी ग्वाही देत आहेत. या ग्वाहीमागे मोदींनी केलेले काम तर आहेच पण मोदींइतके सक्षम नेतृत्व त्यांच्या विरोधकांतून निर्माण झालेले नाही हेही एक कारण आहे.

गेल्या काही दिवसांपासून मोदी विरोधकांचे ऐक्य निर्माण करून नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची चर्चा मोदींच्या विरोधकात सुरू झालेली होती खरी परंतु आता कालच नितीशकुमार यांनी आपण पंतप्रधान पदास इच्छुक नाही असे जाहीर केले आहे. नितीशकुमार हे एक त्यातल्या त्यात विश्‍वासार्ह असे मोदींसाठीचे पर्यायी नेतृत्व होते आणि विरोधकांकडे त्यापेक्षा सक्षम नेता कोणीही नाही आणि आता नितीशकुमार यांनीच माघार घेतली आहे. नितीशकुमार मैदानात उतरले असले तरीही मोदींचा मार्ग काही अवघड नव्हता. आता तर त्यांनी माघार घेतल्यामुळे मोदींचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. मोदींना पर्यायी नेतृत्व उभे करायचे असेल तर राष्ट्रव्यापी व्याप्ती असलेल्या कॉंग्रेससारख्या पक्षाने पुढाकार घेऊन अन्य छोट्या पक्षांची आघाडी उभी केली पाहिजे. परंतु या बाबतीत कॉंग्रेस पुढाकार घेत नाही. २०१४ साली झालेल्या पराभवातून हा पक्ष अजूनही सावरलेला नाही. येत्या दोन वर्षात तो फार सावरेल अशीही स्थिती नाही. त्यामुळे मोदी विरोधी आघाडी हे स्वप्नच राहणार आहे. त्यातच नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांमध्ये अनेक लोकोपयोगी कामे करून लोकांच्या मनात विश्‍वास आणि आशा िनर्माण केलेली आहे आणि मोदी हे भ्रष्टाचाराला चाप लावणारे सक्षम नेते आहेत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. एका बाजूला पर्यायी नेतृत्वाच्या बाबतीत निराशाजनक चित्र आणि दुसर्‍या बाजूला मोदींचा करिश्मा कायम असणे हे तीन वर्षांनंतरचे चित्र आहे.

२०१४ साली सत्तेवर येताना नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचा वायदा केला होता. अच्छे दिन हा शब्द मोठा संदिग्ध आहे. त्यामुळे ज्या नकारात्मक चित्र उभे करायचे असेल त्याला तसे ते उभे करता यावे अशी स्थिती काही बाबतीत निर्माण झालेली आहे मात्र ज्यांना सकारात्मकरित्या मोदी सरकारकडे पहायचे असेल त्यांच्यासाठीसुध्दा नरेंद्र मोदी यांनी बर्‍याच गोष्टी केलेल्या दिसतील. ज्या भारतीय लोकांनी आजवर कधी बँकेची पायरी चढलेली नव्हती. त्यांच्यासाठी मोदी सरकारने जनधन योजना सुरू केली. या जनधन योजनेत २८ कोटी खाती उघडली गेली आहेत. कमीत कमी वेळेत अधिकाधिक खाती उघडण्याचा जागतिक विक्रम आहे. ही गोष्ट मोठी कौतुकास्पद आहे. परंतु ही खाती उघडताना सरकारने या लोकांना देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ही कृती केली असल्याचे सांगितले होते. खाती उघडली गेली आहेत परंतु या लोकांना आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम झालेले दिसत नाही. ते होणे जरुरीचे आहे. केवळ खाती उघडण्याचा विक्रम केल्याचे कौतुक फार दिवस उपयोगाचे नाही.

एखाद्या छोट्या उद्योजकाला स्वतःचा उद्योग उभा करायचा असेल तर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच त्याला दोन जामीन दिल्याशिवाय बँक उभीसुध्दा करत नाही. मोदी सरकारने मात्र ही अडचण दूर केलेली आहे आणि देशातल्या ७ कोटी लोकांना मुद्रा योजनेतून जवळपास ३३ लाख कोटी रुपये कर्ज वितरित केलेले आहे. देशातल्या गरीब माणसाला आयुष्याची कसलीच शाश्‍वती नसते. त्यातल्या त्यात कुटुंबातला कर्ता माणूस अचानकपणे गेला की कुटुंब उघड्यावर पडते. हे संकट टाळण्यासाठी विम्याचे संरक्षण मिळू शकते. परंतु गरिबांसाठी विमा सोपा नव्हता. तो मोदींनी सोपा केला आहे आणि अतीशय नाममात्र हप्त्यामध्ये विम्याचे संरक्षण गरीब लोकांना प्रदान केले आहे. अशा विमा योजनेचा लाभ देशाच्या १० कोटी लोकांना झाला आहे. आपल्या देशातल्या शेतकरी शेती करतो म्हणजे निसर्गाशी जुगार खेळत असतो. त्या जुगारात निसर्ग जिंकला आणि शेतकरी हरला की शेतकरी उघड्यावर पडतो. कित्येक शतकांपासून शेतकरी असा हरत आलेला आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या शेतकर्‍यांना या संकटापासून वाचवण्यासाठी पीक विमा व्यापक आणि स्वस्त केला आहे. निसर्गाने फटका मारला तर पीक विम्यातून शेतकर्‍यांना भरपाई दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे नरेंद्र मोदींनी पर्यायी शासननीतीचा आदर्श घालून दिला आहे आणि लोकांना घाणीत राहण्याची सवय झाली होती. तिच्यातून त्यांना बाहेर काढण्याची स्वच्छतेच्या अभियानाला गती दिली आहे.

Leave a Comment