नोकियाचा ३३१० फक्त ३३१० रुपयात


नोकिया कंपनीने एकीकडे स्मार्टफोनची जोरदार स्पर्धा चालू असताना आपले जुने मॉडेल नव्या रुपात ग्राहकांसमोर आणले असून नोकियाच्या ३३१० या हॅंडसेटचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे.

कंपनीने ३३१० मॉडेल नंबर असलेल्या या फोनची किंमतही ३३१० रुपये इतकीच ठेवली आहे. या फोनची निर्मिती नोकियाच्या मोबाईलचे उत्पादन करणाऱ्या एचएमडी ग्लोबल या कंपनीने केली असून भारतात हा फोन १८ मे रोजी दुकानांमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. भारतात सध्या हा फोन चार रंगांत येणार आहे. यातील लाल आणि पिवळ्या रंगाचे मॉडेल ग्लॉस फिनिशमध्ये असेल तर निळ्या आणि राखाडी रंगाचे मॉडेल मॅट फिनिशमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे.

कंपनीने ३३१० या मोबाईलची बॅटरी चांगल्या प्रतीची असून ग्राहक दिवसभर मोबाईलवर बोलले तरीही ती टिकून राहू शकते असा दावाही केला आहे. या फोनमधून नागरीकांना कॉलिंगशिवाय मेसेज पाठविणे, छायाचित्र काढणे अशा किमान सुविधांसह एफएम रेडिओ आणि एमपीथ्री प्लेयर अशा सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीचे उपाध्यक्ष अजेय मेहता याविषयी बोलताना म्हणाले, अनेक नवीन स्मार्टफोन सध्या बाजारात आले असले तरीही या फोनमुळे तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील. याची बॅटरीही आता बाजारात असणाऱ्या फोनइतकीच चांगली असल्याने ग्राहकांची निश्चितच निराशा होणार नाही.

Leave a Comment