सध्यातरी एटीएम व नेट बँकिंगचा वापर टाळा; बँकांचा सल्ला


नवी दिल्ली- देशातील अर्ध्या डझनाहून अधिक बँकांनी रॅन्समवेअर व्हायरस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एटीएम प्रणाली बंद केली आहे. गोंधळ होऊ नये म्हणून बँकांची नावे जाहीर केली नाहीत. गरज नसेल तर एक-दोन दिवस एटीएम, नेट बँकिंगचा वापर टाळा, असा सल्ला बँकांनी दिला आहे. तर दुसरीकडे ५० लाख सिस्टिम सरकारने अपग्रेड केल्या आहेत. यासोबतच सेंसेटिव्ह मिनिस्ट्रीज मधील अधिकार्‍यांना स्टँडअलोन कॉम्प्युटरवर काम करण्‍याचा सल्ला दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारतात बहुतांश एटीएम हे मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या जुन्या व्हर्जनवर काम करत आहेत. सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे एटीएम असुरक्षित आहेत. देशभरात एकूण २.२ लाख एटीएम असून त्यापैकी बहुतांश एटीएममध्ये विंडोज एक्सपीचा वापर करण्यात येत आहे.

सरकारने रॅन्समवेअर हल्ल्याचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली. शक्यता होती, तसा सोमवारी कोणताही मोठा हल्ला झाला नाही. केरळ, महाराष्ट्र आंध्र प्रदेशातील एखाद-दुसरी घटना समोर आली आहे. रॅन्समवेअरबाबत महाराष्ट्र सायबर विभागाने मोफत हेल्पलाइन सुरू केली. ०२५३६६३१७७७ या क्रमांकावर १६ १७ मे रोजी रॅन्समवेअर हल्ला उपाययोजनांबाबत सुरक्षा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेता येईल.

Leave a Comment