हिंदू संस्कृतीच्या ठायी ठायी खुणा मिरविणारा इंडोनेशिया


भारताचा शेजारी इंडोनेशिया हा ९० टक्के मुस्लीम नागरिकांचा देश आजही भारतातील हिंदू संस्कृतीच्या खुणा ठायी ठायी मिरवित असलेला देश आहे. कधीकाळी या देशावर हिंदू राजांचे राज्य होते व त्यांनी निर्माण केलेली अनेक मंदिरे, वास्तू आजही येथे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि हिंदू संस्कृतीनुसार असलेल्या अनेक प्रथा येथे आजही मोठ्या प्रमाणावर पाळल्या जातात. इंडोनेशियातील बाली हे जागतिक लोकप्रियता लाभलेले पर्यटन स्थळ हिंदू संस्कृतीचा आत्मा आपल्या गाभ्यात सांभाळून आहे. यामुळेच येथे जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात.

इंडोनेशियात हिंदू व इस्लाम संस्कृतीचा मनोहारी संगम झालेला आहे. राजधानी जकार्ता च्या मधोमध प्रंचड मोठे शिल्प असून कृष्ण आणि अर्जुन रथावर स्वार झालेले हे शिल्प महाभारताचा वारसा सांगते. इंडोनेशियात आजही रामायण व महाभारतातील कथांवर नृत्य, नाट्ये वर्षभर केली जातात. असे म्हणतात की ६ व्या, ७ व्या शतकात ऋषी मार्केंडेय यांनी येथे हिंदू संस्कृती रूजवली. बाली बेटावर तर आजही दररोज रामायण महाभारतातील कथांवर नाट्ये केली जातात व येथील प्रचंड संख्येने असलेली मंदिरे आजही नांदती गाजती आहेत. येथील लोक स्वतःला मोठ्या अभिमानाने हिंदू म्हणवून घेतात.


इंडोनेशियात विमानाने उतरतानाच आपल्याला या देशात मिसळल्या गेलेल्या हिंदू संस्कृतीच्या खुणा आढळू लागतात. येथील सरकारी विमान कंपनीचे नांवच मुळी गरूडा एअरवेज आहे. या देशातील चलनी नोटांवर गणेशाची प्रतिमा आहे. येथे गणेश ही कला, शिक्षण व विज्ञानाचे प्रतीक मानले जाते. इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोधचिन्हंही गरूड आहे. रामायणाचा या देशावर प्रचंड प्रभाव आहे. रामकथा येथे अनेक मंदिरातून शिल्पातून कोरली गेली आहे. भारतात वाल्मिकी रामायण प्रमाण मानले जाते तर येथे कवी योगेश्वर याने लिहिलेले काबी भाषेतील रामायण प्रमाण मानले जाते. या देशात रामायणातील अनेक अवशेष आहेत.

बाली बेट या देशाचा मुकुटमणी असून येथे पर्यटकांची वर्षभर सतत वर्दळ असते. येथील लोकांना भारतात येऊन गंगास्नान करण्याची तसेच कुरू क्षेत्राला भेट देण्याची प्रचंड ओढ आहे. इतकेच नव्हे तर भारतात येऊन गेलेले येथले पर्यटक भारतात आम्हाला आमच्याच देशात असल्यासारखे वाटते असाही अनुभव सांगतात. येथे संस्कृत भाषा चांगली रूजली आहे व अनेकांना ही भाषा बोलता येते तसेच कळतेही.

Leave a Comment