वधूंचे अपहरण


राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्यामुळे तिथे विवाह संस्थेमध्ये अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी हरियाणामध्ये आसामच्या आदिवासी भागातून किंवा केरळमधून मोठ्या प्रमाणावर मुली नेल्या जात आहेत. या मुली नेण्याचा प्रकार तसा वैध आहे. तिथले काही वरपिते या भागात जाऊन वधूपित्यांच्या भेटी घेऊन सरळ सरळ त्यांच्या मुलींना मागणी घालतात आणि हुंडा न घेता विवाह करण्याचे वचन देतात. शिवाय विवाहानंतर मुलगी तिच्या सासरी सुखी राहील याची हमी देतात. शिवाय अशा मागण्या घालणारे वरपिते हे श्रीमंत असल्यामुळे अशा गरीब वधूपित्यांना तिकडे मुली देण्यामध्ये काही गैर वाटत नाही. अशा व्यवहारातून त्यांची हुंड्याच्या संकटातून मुक्तता होते.

असे असले तरी अलीकडच्या काळात कर्नाटकातून मुलींना राजस्थानात नेऊन तिथल्या मुलांशी विवाह लावण्याचे एक रॅकेट आता उघड झाले आहे. राजस्थानात मुलींची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या मुलींना मागणी आहे. मात्र या गरजेतून वैध पध्दतीने मुलींचे विवाह न लावता त्यांच्या मातापित्यांना फसवून तिकडे मुली नेल्या जात आहे. असे एक रॅकेट सध्या उघड झाले आहे. राजस्थानातल्या श्रीमंत कुटुंबांना आपल्या मुलांच्या विवाहासाठी मुली मिळत नसल्यामुळे कर्नाटकातून मुली आणणार्‍या अशा एजंटांना ते भरपूर मोबदला देत आहेत. त्यातून असा एक व्यवसायच वृध्दिंगत झाला आहे.

कनार्र्टकाच्या हस्सन जिल्ह्यातील एक मुलगी बेपत्ता झाली. तिचे आईवडील फार गरीब असल्यामुळे ते तिचा फार कसोशीने शोध घेऊन शकले नाहीत. परंतु पोलिसांच्या तपासामध्ये तिचा राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका कुटुंबात विवाह लावून देण्यात आल्याचे उघड झाले. परंतु हे प्रकरण एवढे सरळ नव्हते. तिला पळवून नेणार्‍या एजंटांनी तिचे दोघा तिघांशी विवाह लावून दिले आणि त्या प्रत्येकाकडून काही लाख रुपये मोबदला मिळवला. एक लग्न लावून दिल्यानंतर मोबदला पदरात पडला की हे लोक त्या मुलीला पुन्हा पळवून तिचा दुसर्‍याशी विवाह लावत असत. अशा प्रकारचे एक निंदनीय रॅकेट देशभरच जारी असल्याची शक्यता आता पोलिसांना वाटायला लागली आहे. कारण मुलींची कमतरता हा केवळ हरियाणा किंवा राजस्थानचा विषय राहिलेला नाही तर देशाच्या सगळ्याच भागांमध्ये ही समस्या भेडसावत आहे. समस्या निर्माण झाली की एजंट कामाला लागतात आणि समस्येतून कमाई करून घेतात.

Leave a Comment