मिस्टर करप्ट केजरीवाल


आम आदमी पार्टी स्थापन होण्याच्या आधी अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना हा पक्ष स्थापन न करण्याचा सल्ला दिला होता. कारण अण्णांना एक गोष्ट माहीत होती की सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता हाती आल्यास माणूस अधिकच भ्रष्ट होतो. आपल्या देशातल्या अनेक लोकांच्या बाबतीत असे घडलेले आहे. परंतु त्यांच्या आयुष्यात या घटना पक्ष स्थापनेनंतर काही वर्षांनी घडलेल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांना मात्र सत्तेची आणि पैशाची चटक लागायला काही महिनेसुध्दा लागले नाहीत. कारण त्यांच्या हाती आलेली सत्ता ही निरंकुश होती. ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले तेच मुळात राक्षसी बहुमत मिळवून. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ६७ जागा त्यांच्या पक्षाला मिळाल्या आणि हे सारे यश वरकरणी आम आदमी पार्टीचे असले तरी ते अरविंद केजरीवाल यांच्यामुळेच मिळाले आहे असे वातावरण तयार होऊन ही सत्ता केजरीवाल यांच्या डोक्यात शिरली. ते तसे राजकारणात नवे होते. त्यामुळे त्यांच्या काही कल्पना अफाट होत्या.

त्या अफाट कल्पना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे केजरीवाल यांचे हसे झाले. परंतु ते भ्रष्टाचारात लिंपून गेले ही गोष्ट त्यांच्या बनेलपणाचे द्योतक आहे. त्यांच्या पक्षात आणि सरकारमध्ये त्यांच्या विरोधात कोणी आवाज करू शकत नाही. जे आवाज करणारे होते ते पक्षाबाहेर फेकले गेले. योगेंद्र यादव, प्रशांत भूषण असे काही दिग्गज नेते केवळ केजरीवाल यांच्या कार्यपध्दतीविरुध्द बोलल्यामुळे पक्षातून हाकलले गेले. आपल्या विरुध्द बोलणार्‍याला पक्षातून काढण्याने पक्षावरही काही परिणाम होत नाही आणि राक्षसी बहुमत असणार्‍या सरकारवरही काही परिणाम होत नाही याची जाणीव झाल्यामुळे अरविंद केजरीवाल अधिक निरंकुश होत गेले. आपल्या देशातले अनेक राजकीय नेते जोपर्यंत राजकारणात पडत नाहीत तोपर्यंत त्यागाच्या आणि भ्रष्टाचार मुक्तीच्या बाता करत असतात. परंतु त्यांना एकदा खुर्चीची सवय लागली किंवा नेमकेपणाने सांगायचे तर सत्तेची चटक लागली की मात्र त्यांच्या त्या बाता सौम्य व्हायला लागतात आणि ते छोट्यामोठ्या भ्रष्ट व्यवहारात गुुंतून त्यांचे समर्थनही करायला लागतात. पैसा ही एक गोष्ट एवढी वाईट असते की ती विनासायास मिळायला लागली की तिची हाव सुटत नाही. अरविंद केजरीवाल यांना तर त्यांच्यावर दाखल झालेले अनेक खटले लढवण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे. म्हणून त्यांना तर सहजपणे मिळणार्‍या पैशाचा मोह आवरता आलेला नाही.

आता त्यांच्याच पक्षात मंत्री असलेल्या कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचार उघड करणारे ठोस पुरावे दाखल केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना मिळालेल्या देणग्यांचे आकडे चेक नंबरसहीत जाहीर करून आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांनी आयकर खात्याला कसे मूर्ख बनवले आहे हे दाखवून दिले आहे. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांचे आणि आम आदमी पार्टीचे सारे काळे व्यवहार जवळून पाहिले आहेत आणि नंतरच त्याचे पुरावे देऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाचीही दिशाभूल केल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे. केजरीवाल यांच्याविरुध्दचे हे आरोप गंभीर आहेत. तसे आपल्या देशातल्या अनेक पुढार्‍यांवर लहान मोठे आरोप होतच असतात. परंतु केजरीवाल यांच्यावर आरोप होणे हे यासाठी गंभीर आहे की हेच केजरीवाल दोन वर्षांपूर्वी नैतिकतेच्या गप्पा मारून सार्‍या देशातला भ्रष्टाचार संपवण्याच्या वल्गना करत होते. आज त्यांचीच वागणूक त्या नैतिकतेच्या तत्वज्ञानशी विसंगत ठरली आहे.

ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्याने ते भ्रष्टाचाराचे आरोप कसे खोटे आहेत हे सिध्द केले पाहिजे. ते त्याचे कर्तव्य ठरते. परंतु आम आदमी पार्टीला ते सिध्द करणे अवघड जात असावे. म्हणूनच अरविंद केजरीवाल या आरोपावर एक शब्दही बोलत नाहीत. पण त्यांच्या पक्षातले अन्य नेतेही आरोपाचे पुरावे कसे खोटेत आहेत हे दाखवून देण्याच्या ऐवजी विषयांतर करून हे आरोप म्हणजे भाजपाचा कट आहे असा हेत्वारोप करून मूळ आरोपाला बगल देत आहेत. जेव्हा मूळ आरोपावर काहीच बोलता येत नाही तेव्हा अशीच युक्ती केली जाते ती केजरीवाल करत आहेत. केजरीवाल अन्य लोकांवर आरोप करताना तकलादूसुध्दा पुरावा देण्याची तसदी घेत नव्हते. पण आता त्यांच्या विरोधात ठोस आणि पुराव्याच्या आधारे आरोप केले जात असूनही त्यांची चौकशी करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या उत्तरातून ते स्वतःला निर्दोष जाहीर करत आहेत. परंतु असे स्वयंघोषित निर्दोषित्व लोकांना कधीच पटणार नाही. ज्या माणसावर आरोप होतो तोच जर असे न्यायदान करून स्वतःला निर्दोष जाहीर करत असेल तर मग या देशात न्यायालये कशाला स्थापन केली आहेत? केजरीवाल यांच्या विरुध्दच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी निःपक्षपाती यंत्रणेकडून झाली पाहिजे आणि तोपर्यंत केजरीवाल यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते इतरांवर आरोप करतात तेव्हा ते अशीच मागणी करतात.

Leave a Comment