गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘आदियोगी’ शिवा मूर्तीची नोंद


नवी दिल्ली – ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये तामिळनाडूतील कोईंबतूर येथे असलेल्या शिवाच्या ११२ फूट उंच भव्य मूर्तीची नोंद झाली असून ‘आदियोगी’च्या या मूर्तीला जगातील सगळ्यात उंच आणि भव्य अर्धाकृती मूर्तीचा मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचे फेब्रुवारी महिन्यात अनावरण करण्यात आले होते.

या मूर्तीची प्रतिष्ठापना ‘ईशा फाऊंडेशन’ने केली असून अनेक भाविकांना ११२ फूट उंच, २२ मीटर रुंद, १४७ फूट लांबी असलेली शिवाची ही प्रतिमा आपल्याकडे आकर्षित करते. अडीच वर्षांचा कालावधी ही मूर्ती तयार करण्यासाठी लागला होता. त्यानंतर पुढच्या आठ महिन्यात ईशा फाऊंडेशने या मूर्तीचे उर्वरित काम पूर्ण केले होते. शिवाची ही मूर्ती पूर्णपणे स्टीलपासून बनवण्यात आली आहे. ही मूर्ती धातूचे तुकडे जोडून बनवण्यात आली आहे. आतापर्यंत एखाद्या मूर्तीचे निर्माण कार्य करताना अशा पद्धतीचा वापर केला गेला नव्हता. या मूर्तीच्या नावे विश्वविक्रमाची नोंद झाल्यानंतर आता याच उंचीच्या अनेक प्रतिमा देशभर स्थापन करण्याचा ईशा फाऊंडेशनचा मानस आहे.

Leave a Comment