ग्रेट ब्रिटनमधील घरे भारतीय एलईडीनी उजळणार


भारताला तीन वर्षात एलईडी बल्ब वापरात अव्वल स्थानी नेणार्‍या उजाला योजनेची व्याप्ती ग्रेट ब्रिटन व युरोपच्या अन्य देशांपर्यंत वाढविली जात असून सरकारी वीज कंपन्यांनी एकत्र येऊन बनविलेली ईईएसएल म्हणजे एनर्जी एफिशिएंट सर्व्हीस लिमिटेड कंपनी भारत सरकारची उजाला योजना नवीन रूपात लंडनमध्ये सादर करत आहे. उर्जा मंत्री पियूष गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

फिक्की व ईईएसएल परदेशात उजाला योजनेचा विस्तार करत असून परदेशात विस्तार योजना आखणारी ही पहिलीच वीज कंपनी आहे असे सांगून गोयल म्हणाले येत्या दोन वर्षात लंडनमध्ये १० कोटी साधे बल्ब एलईडी मध्ये बदलण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. भारतात या योजनेअंतर्गत तीन वर्षात एलईडीच्या किंमतीत ८५ टक्के घट झाली असून वीज ग्राहकांची वीज बिलेही १५ टक्कयांनी कमी झाली आहेत. भारत एलईडीचा जगातील सर्वात मोठा बाजार आहे व ईईएसएल वीज संरक्षणाच्या क्षेत्रात असलेली अव्वल कंपनी बनली आहे.

ब्रिटनमध्ये ईईएसएल १० कोटी पौंड गुंतविण्याच्या विचारात आहे. युरोपमध्येही नव्याने पर्यावरण जागृती होत आहे व त्यामुळे या कंपनीला युरोपमध्ये मोठा बाजार उपलब्ध होत आहे. भारतात ३ वर्षाच्या काळात ७७ कोटी साधे बल्बपैकी ५६ कोटी एलईडी ने रिप्लेस केले आहेत त्यात ईईएसएलचा वाटा २३ कोटी बल्बचा आहे. आता ही कंपनी परदेशी बाजारावर लक्ष ठेवून आहे.

Leave a Comment