मच्छरदाणीच बनणार डासांची कर्दनकाळ


अब्जावधी रूपये खर्च करून मलेरिया, डेंग्यू या सारख्या डासांपासून फैलावणार्‍या रोगांवर अद्यापी रामबाण इलाज सापडलेला नाही. मात्र मलेरिया डेंग्यूच्या प्रसारामुळे हैराण झालेल्या भारतीयांसाठी असे एक जाळे विणले जात आहे, ज्यामुळे डासांचा खातमा सहज शक्य होणार आहे. भारतीय बाजारात अशी एक मच्छरदाणी येत आहे, ज्यात मच्छरदाणीला डासांचा नुसता स्पर्श झाला तरी डास मरणार आहेत. चीन, दक्षिण अफ्रिकेत अशा मच्छरदाण्या वापरात आहेत. आता भारतात केंद्रीय पर्यायवण मंत्रालयानेही या मच्छरदाण्यांच्या उत्पादनाला परवानगी दिली आहे.

आजपर्यंत भारतात मलेरिया, डेंग्यूच्या निर्मूलनासाठी अब्जावधी रूपये खर्च केले गेले आहेत मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही.लाँग लास्टींग इन्सेक्टिसाईड नेट या नावाने तयार करण्यात आलेल्या या मच्छरदाण्यांचे आता देशातच उत्पादन केले जाणार असून त्यासाठी संयक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे. देशात एस. पी. मोहंती यांच्या कंपनीला हा ठेका मिळाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात ज्या जातीच्या डासांचा अधिक प्रादुर्भाव आहे त्यानुसार मुंबई आयआयटीच्या रसायन विभागाचे सहाय्य घेऊन औषध तयार करण्यात आले आहे. या औषधाचा लेप मच्छरदाणीच्या कापडावर दिला जाईल. या मच्छरदाणीला डासाचा स्पर्श होताच डास मरतील.एप्रिल २०१८ पासून या मच्छरदाण्या बाजारात विक्रीसाठी येणार आहेत.

Leave a Comment