टिंबकटू – केवळ कथेतले नव्हे तर प्रत्यक्षातले प्राचीन शहर


लहानपणापासून गोष्टी ऐकताना आपण अनेकदा टिंबक्टू गावाचे नांव ऐकले असेल. कदाचित हे एखाद्या काल्पनिक नगरीचे नांव असावे असाही आपला समज असेल. पण तसे नाही. टिंबक्टू हे प्राचीन काळी खूप प्रसिद्ध असलेले पण आता विस्मृतीत गेलेले अफ्रिकेतील माले या देशातले शहर आहे. आज हे शहर जवळजवळ उध्वस्त झाले असले तरी एकेकाळी ते मोठे शैक्षणिक केंद्र तसेच ३३३ संतांचे नगर म्हणून जगात ओळखले जात होते. जगभरात इस्लाम आणि कुराण अभ्यासकांसाठी हे शहर अत्यंत महत्त्वाचे केंद्र होते.२०१२ मध्ये दहशतवादी हल्ल्यांमुळे ते उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे.


मालेच्या समृद्ध सांस्कृतिक, अध्यात्मिक तसेच धार्मिक वारसा सांगणारे हे शहर संयुक्त राष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केले आहे. पाचव्या शतकातील या शहरात १५ व्या १६ व्या शतकात व्यापारी केंद्र म्हणून मोठमोठे व्यवहार केले जात होते. वाळवंटातून उंटांवरून सोने वाहतूक केली जात असे. म्हणजे मुस्लीम व्यापारी या शहरातून पश्चिम अफ्रिकेतून सोने नेऊन युरोप व मध्यपूर्वेच्या बाजारात विकत व त्यातून मीठ व अन्य उपयुक्त वस्तू आणत असत. या गावात सोने आणि मीठ यांच्या किमती त्याकाळी सारख्याच होत्या. १६ व्या १७ व्या शतकात अटलांटिक महासागरातून व्यापार होऊ लागल्यावर या शहराचे महत्त्व ओसरले. आज तेथे चौफेर वाळू व उकाडा असल्याने शहर सुनसान वाटते मात्र आजही हजारो पर्यटक आकर्षित होतात. रस्ते नाहीत, लुटारूंचे भय पर्यटकांना या शहरापासून अलिप्त ठेवू शकत नाही. या शहराचे पर्यटन हेच आता रोजगाराचे साधन आहे.

येथील सांकोर विश्वविद्यालयातून हजारो विद्वान संपूर्ण पूर्व अाफ्रिकेत मुस्लीम प्रसारासाठी गेले. माती आणि गारगोट्यांपासून बनविलेली विशालकाय जिंगरेबर मशीद आजही पाहायला मिळते. येथे १६५० सालातील पांडुलिपीतील साहित्याचा संग्रह जतन केला गेला आहे. त्याचे डिजिटलायझेशन केले जात आहे.

Leave a Comment