१४ मे पासून पेट्रोलपंप कर्मचारी करणार एका शिफ्टमध्ये काम


मुंबई – पेट्रोल पंपाचालकांना तेल कंपन्यांनी बैठकीत न बोलवल्याने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्णय घेतला असल्यामुळे येत्या रविवारपासून पेट्रोलपंपांना रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल, तर सोमवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहतील, असा इशारा पेट्रोलपंप चालकांनी दिला आहे.

सन २०११ मध्ये केंद्र सरकारने तेल कंपन्यांना पंप चालविण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा, याचा आढावा घेण्यासाठी अपूर्व चंद्रा समिती नेमली होती. समितीच्या शिफारशीनुसार, या खर्चाला दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेशही दिले गेले होते. मात्र, तेल कंपन्यांनी या आदेशाचे पालन न केल्याने पंपचालकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

४ नोव्हेंबर २०१६ रोजी पंपचालकांनी केलेल्या आंदोलनानंतर चंद्रा समितीच्या निर्देशांनुसार, पंप चालविण्याच्या खर्चाचा परतावा एक जानेवारी २०१७ पासून देण्याबाबतचा लेखी करार तेल कंपन्यांनी कन्सॉर्शियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स या देशपातळीवरील संघटनेशी केला होता. सदर करारातील अटीनुसार, ठरलेल्या मुदतीस तीन महिने उलटून गेल्यानंतरही तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडून सदर कराराची अंमलबजावणी होत नसल्याने फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने १० मे रोजी खरेदी बंद आंदोलन केले. या आंदोलनावेळी संघटनेने तेल कंपन्यांना बैठक बोलाविण्याची विनंती केली होती; परंतु तेल कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संघटनेने साप्ताहिक सुटी आणि पंप एकाच शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

येत्या १४ मे पासून राज्यात प्रत्येक रविवारी सर्व पंपचालक सामूहिक सुट्टी घेतील. या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीही मिळणार नाही, असे पेट्रोलपंप चालकांनी स्पष्टी केले आहे. तर १५ मे पासून महाराष्ट्रातील सर्व पेट्रोलपंप सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत एका शिफ्टनुसार चालतील, असेही पेट्रोलपंप चालकांनी सांगितले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Leave a Comment