चिअरलीडर्समुळे पुरुष कर्मचा-यांच्या कामात लक्षणीय सुधारणा


बीजिंग: चिअरलीडर्स या आयपीएलमुळे घरोघरी पोहोचल्या आणि त्या अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर चिअरलीडर्सची आता अनेक स्थानिक टुर्नामेंटमध्येही मागणी केली जात आहे. पण ही मागणी आता केवळ क्रिकेटपुरती मर्यादित राहिलेली नाही, आता चक्क त्या ऑफिसमध्ये देखील पोहोचल्या आहेत. चीनमधील एका टेक कार्यालयाने ऑफिसमध्ये काम केल्याने थकवा जाणवू नये म्हणून मनोरंजनासाठी चक्क चिअरलीडर्स भाड्याने आणल्या आहेत. विशेष म्हणजे चिअरलीडर्स आल्यापासून कंपनीतील पुरुष कर्मचार्‍यांच्या कामात लक्षणीय सुधारणा झाल्याचेही कंपनी सांगत आहे. इंटरनेटवर सध्या ऑफिसमध्ये चिअरलीडर्स आणल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने टॅलंटेड चिअरलीडर्स कंपनीत नेमल्या आहेत. या चिअरलीडर्स कर्मचार्‍यांना कंटाळा आला असेल तर त्यांचे मनोरंजन करतात, त्यांचा मूड ऑफ असेल तर तो ठीक करतात, त्यांच्याबरोबर चॅटिंग करतात, पिगपाँग खेळतात. यामुळे कर्मचार्‍याना मोटीवेशन मिळते व ते अधिक जोमाने व वेगाने त्यांची कामे पूर्ण करतात.

या चिअर लीडर्स कामाच्या ठिकाणचे वातावरण आनंदी ठेवण्यास खूपच उपयोगी पडतात तसेच त्यांच्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचा आपसातील संवाद वाढतो परिणामी एकमेकांच्या सहकार्याने कामे निपटण्याकडे कर्मचार्‍यांचा कल वाढतो असाही अनुभव येत आहे.