पाकिस्तानची कोंडी


पाकिस्तान सातत्याने भारतावर छुपे हल्ले करत आहे आणि त्याला भारताने चोख उत्तर द्यावे अशा मागणीचा दबाव भारतीय नागरिकांकडून सरकारवर आणला जात आहे. सरकार लोकांना अपेक्षित असलेल्या मार्गाने पाकिस्तानला उत्तर देईलच असे काही सांगता येत नाही. परंतु पाकिस्तानच्या निमित्ताने सुरू असलेल्या देशातल्या आणि परदेशातल्या सगळ्या हालचालींचा वेध घेतला असता पाकिस्तानला केवळ भारताकडूनच नव्हे तर इतरही काही देशांकडून शासीत केले जाण्याची शक्यता दिसायला लागली आहे. केवळ भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यापेक्षा एका बाजूने भारत, दुसर्‍या बाजूने अफगाण आणि तिसर्‍या बाजूने इराण अशी पाकिस्तानची तिहेरी कोंडी करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न असावा असे सूचित करणार्‍या घटना समोर येत आहेत.

पाकिस्तानातले दहशतवादी एवढे मोकाट सुटले आहेत की त्यांनी भारताप्रमाणेच इराणवरसुध्दा छुपे हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे इराण सरकारसुध्दा त्रस्त आहे. इराणच्या सरकारने नुकतीच याबाबत पाकिस्तानला धमकावणी दिली असून आपणही भारताप्रमाणेच पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करू असे म्हटले आहे. इराणने अशी कारवाई करण्याचे एक कारण आहे. पाकिस्तानचा जो बलुचिस्तान हा प्रांत वादग्रस्त ठरला आहे तो बलुचिस्तान पूर्णपणे पाकिस्तानात नाही आणि बलुचिस्तानचा काही भाग इराणमध्येसुध्दा आहे आणि त्यामुळे पाकिस्तानातले अतिरेकी इराणमध्ये घातपाती कारवाया करत असतात. त्यामुळे इराण पाकिस्तानवर डुख धरून आहे.

तिसर्‍या बाजूला अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानात तर पाकिस्तानच्या कारवाया मोठ्या प्रमाणावर सुरू असतात. अफगाणिस्तानात उच्छाद मांडणारे तालिबान अतिरेकी हे पाकिस्तानातच प्रशिक्षण घेऊन तयार झालेले आहेत आणि पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात तालिबानच्या मदतीने मोठी घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. म्हणून नुकतीच अफगाणिस्ताननेसुध्दा पाकिस्तानवर लष्करी कारवाई केलेली आहे. अशी पाकिस्तानची इराण, अफगाणिस्तान आणि भारत अशा तिन्हींकडूनही कोंडी झाली तर पाकिस्तानचा दारूण पराभव आणि विघटन व्हायला काहीही वेळ लागणार नाही. या विघटनाची गती वाढण्यासाठी अमेरिकासुध्दा मदत करण्याची शक्यता आहे. तसे संकेतही मिळाले आहेत.

Leave a Comment