मोदी सरकार पुन्हा नोटाबंदीच्या तयारीत ?


नवी दिल्ली – पुन्हा एकदा मोदी सरकार नोटाबंदी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अद्यापही काळा पैसा बाळगणा-यांना अदद्ल घडलेली नाही. २००० रुपयांच्या नोटा बाजारातून गायब होत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. जर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून पन्नास टक्क्यांहून अधिक गायब झाल्या तर पुन्हा एकदा तसाच प्रकार घडू शकतो. चलनातून गायब झालेल्या मोठ्या नोटा पून्हा परत आणण्याची शक्यता पूर्ण संपल्यानंतर नोटाबंदी सारखा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

असाच एक प्रकार कानपूरमधील स्थानिक बाजारात घडल्याचे समोर आले आहे. येथे २००० रुपयांच्या नोटा गायब होत आहेत. अशा परिस्थितीत कानपुरमधील रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक कार्यालयात आकड्यांमुळे खळबळ उडाली आहे. कानपूरमध्ये २०१६च्या शेवटी २०००रुपयांच्या नोटा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तेव्हापासून आतापर्यंत आरबीआयने करन्सी चेस्टला जवळपास ६०००कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा दिल्या आहेत. मार्च महिन्यापर्यंत बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा जमा होण्याची स्थिती सुरळीत सुरु होती मात्र, एप्रिल महिन्यात बाजारातून २ हजार रुपयांच्या नोटा अचानक गायब होण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर बँकेत दहा, वीस, पन्नास आणि १०० रुपयांच्या नोटा अधिक जमा होत आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, हे आकडे केवळ एकाच क्षेत्राचे आहेत. देशातील इतर क्षेत्रांची माहिती समोर आल्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल. २००० रुपयांच्या ३५ टक्के नोटा एप्रिलमध्ये गायब झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात समोर आलेले हे आकडे खुपच धक्कादायक आहेत.

आता साप्ताहिक रुपात बँकांमध्ये जमा होणा-या नोटांची माहिती मागविली जात आहे. नोट, सुटे पैसे या सर्वांची माहिती बँकेचे अधिकारी आपल्याकडे ठेवतात आणि संध्याकाळी करन्सी चेस्टच्या सर्व्हरवर हा आकडा पोस्ट करतात. नोटाबंदी दरम्यान दररोज हा आकडा आरबीआयला पाठविण्यात येत होता. आता पून्हा बँकांमध्ये डिपॉझिट होणारे २००० रुपये, ५०० रुपये, १०० रुपयांच्या नोटा आणि सुट्या पैशांची माहिती नोंद करण्यात येत आहे.

Leave a Comment