वैचारिक ध्रुवीकरण


राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निवृत्तीची वेळ जवळ येत आहे आणि त्यामुळे नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने लढवल्या जाणार्‍या डावपेचांना गती आली आहे. खरे म्हणजे अशा गतीला काही अर्थ नाही. कारण भारतीय जनता पार्टी आणि रालो आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार हे निश्‍चित आहे. तसे रालो आघाडीजवळ पूर्णपणे निर्विवाद बहुमत नाही. या आघाडीला काही मते कमी पडत आहेत. असे असले तरी कॉंग्रेस प्रणित यूपीए ही आघाडी रालो आघाडीपेक्षा खुपच मागे आहे. त्यामुळे निवडणूक अटीतटीचीसुध्दा होणार नाही. भारतीय जनता पार्टीला आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडत असली तरी तेवढी मते जमा करणे भाजपाच्या नेत्यांना अवघड नाही. त्यादृष्टीने त्यांनी काही पावले टाकलेलीसुध्दा आहेत. त्यांना आवश्यक तेवढी मतांची बेगमी सहजच करता येईल. निवडणुकीत अशी चुरस नसली तरी सोनिया गांधी सध्या मतांचे गणित मांडत असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिध्द केले आहे. अर्थात त्या गणिताचे तपशील अजून कळलेले नाहीत. मात्र रालो आघाडीला ही निवडणूक अवघड जावी असा त्यांचा प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोनिया गांधी यांनी कितीही प्रयत्न केले तरी आपण लढत आहोत ती लढाई हरण्याची लढाई आहे याची त्यांना जाणीव आहे. तेव्हा आपला उमेदवार पराभूत होणारा असला तरी किंबहुना तशी खात्री असली तरीही या निमित्ताने देशामध्ये वैचारिक ध्रुवीकरण व्हावे असा त्यांचा आणि भाजपा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. म्हणून विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधीचे सर्वात कनिष्ठ चिरंजीव देवदास यांचे पुत्र आहेत. ते भारतीय प्रशासन सेवेत उच्च अधिकारी होते आणि त्यांनी निवृत्तीच्या वयापूर्वीच हे सेवा सोडून समाजकारणात उडी घेतलेली आहे. यूपीएच्या कार्यकालामध्ये ते पश्‍चिम बंगालचे राज्यपाल होते. एकंदरीत हे व्यक्तिमत्त्व भारताचे राष्ट्रपती होण्यास योग्य आहे. मात्र कॉंग्रेसने आणि भाजपा विरोधकांनी त्यांची उमेदवार म्हणून निवड करण्यामागे, ते महात्मा गांधींचे नातू आहेत हे सर्वात सबळ कारण आहे. सध्या केंद्रात सत्तेवर असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष महात्मा गांधींचा कट्टर विरोधक मानला जातो. तेव्हा या पक्षाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या विरोधात आपण गोपाळकृष्ण गांधी यांना उभे केले तर भारतीय जनता पार्टी आणि महात्मा गांधी यांच्यातला वैचारिक भेद लोकांसमोर ठळकपणे येईल, असा विरोधकांचा अंदाज आहे.

महात्मा गांधी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि राष्ट्रपिता आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारांच्या विरोधात महात्मा गांधींच्या नातवाला उभे केल्यामुळे जनतेच्या मनात मोदींच्या विषयी एक वेगळी भावना निर्माण होईल अशा प्रकारचे एक वैचारिक धु्रवीकरण या निवडणुकीच्या निमित्ताने घडावे असा हा प्रयत्न आहे. वास्तविक पाहता नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी यांचा उमेदवार अजून जाहीरसुध्दा झाला नाही. तेव्हा तो उमेदवार कोण असेल याचा अंदाज आल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या राजकीय डावपेचाला काही अर्थ नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे भाजपाचे नेते या पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या एखाद्या उमेदवाराच उभे करतील असा अंदाज करून गोपाळकृष्ण गांधींची उमेदवारी पुढे आलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे नेते वेगळाच विचार करत आहेत. सध्या राज्यपाल असलेल्या ओडिशाच्या आदिवासी नेत्या द्रोपदी मुरमू यांचे नाव भाजपाच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. तसे झाल्यास गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीच्या रूपाने कॉंग्रेसचे नेते घडवू पाहणार्‍या वैचारिक धु्रवीकरणाला सुरूंग लागेल.

महात्मा गांधी यांनी एकदा लोकशाहीची व्याख्या करताना देशात स्वच्छता कामगाराची मुलगी राष्ट्रपती होईल तेव्हाच खरी लोकशाही अवतरली असे म्हणता येईल असे प्रतिपादन केले होते आणि महात्मा गांधींचे चिंतन नेहमी समाजातल्या शेवटच्या माणसासाठी केलेले असे. द्रोपदी मुरमू या अशाच समाजाच्या शेवटच्या थरातल्या आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करणे हे कॉंग्रेससाठी वैचारिकदृष्ट्या घातक ठरणार आहे. मुळात महात्मा गांधींचे नातू म्हणजे महात्मा गांधी नव्हे. तेव्हा गोपाळकृष्ण गांधी यांच्या रूपाने आपण जणू महात्मा गांधींचाच प्रतिनिधी उभा करत आहोत ही विरोधकांची कल्पना चुकीची आहे. विशेष म्हणजे आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेले सारे राजकीय पक्ष हे महात्मा गांधींचे समर्थक नाहीत. कारण त्यात मायावती यांचा बहुजन समाज पार्टी हाही पक्ष आहे. या पक्षाची महात्मा गांधी यांच्या विषयीची मते कधीच लपून राहिलेली नाहीत. बसपा हा पक्ष महात्मा गांधींचा समर्थक नाही. त्यातल्या त्यात आता गोपाळकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे कम्युनिष्ट पक्ष हे कधी गांधी विचारांचे म्हणून ओळखले गेलेले नव्हते. तशी त्यांची ओळख नाही. तेव्हा गांधींचे रूपक वापरून होणार्‍या राजकारणाच्या माध्यमातून अपेक्षित असलेल्या वैचारिक धु्रवीकरणामध्ये साम्यवाद्यांचे गांधींच्या बाजूने असणे ही एक विसंगती ठरणार आहे.

Leave a Comment