टेक महिंद्रामधील १५०० कर्मचाऱ्यांना नारळ


नवी दिल्ली – विप्रो, कॉग्निझंट आणि इन्फोसिस या बड्या आयटी कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्यानंतर आता टेक महिंद्रानेही आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. लवकरच कंपनीच्या तब्बल १५०० कर्मचाऱ्यांना त्यानुसार निरोपाचा नारळ देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने आगामी दोन वर्षात तब्बल १ कोटी रोजगार निर्माण करण्याचा संकल्प जाहीर केला होता. पण सध्याच्या घडीला भारतातील रोजगार क्षेत्रात नेमके उलट चित्र पाहायला मिळत आहे.

याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिना उलटून गेल्याने सध्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वार्षिक बढतीची (अप्रायजल) प्रक्रिया सुरू आहे. पण आयटी आणि टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांसाठी यंदा सुगीचा समजला जाणारा हा हंगाम दु:स्वप्न ठरताना दिसत आहे. ही दैनंदिन प्रक्रिया असल्याचा दावा वारंवार आयटी कंपन्यांकडून केला जात असला तरी कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियांमधून वेगळेच चित्र समोर येत आहे. अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे घरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आता स्वत:ची नोकरी वाचवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

कालच यावरून आयटी कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या ‘एफआयटीई’ने चेन्नई आणि हैदराबाद येथील कामगार आयोगाकडे याचिका दाखल केली होती. यामध्ये कर्नाटक आणि कोईम्बतूरमधील कंपन्यांकडून तडकाफडकी करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

Leave a Comment