कर्करोगाविषयी जागृती


कर्करोग हे जगातले मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. आगामी दोन दशकांमध्ये हेच कारण टिकून राहील असा तज्ञांचा अंदाज आहे. पुढच्या २० वर्षात कर्करोगाने मरणार्‍यांची संख्या ६० टक्क्यांनी वाढून २ कोटी २० लाख एवढे होणार आहे. एवढे हे प्रकरण गंभीर असूनही कर्करोगाविषयी अजूनही आपण म्हणावे तेवढे जागरूक नाही आणि त्याविषयी आपल्या समाजामध्ये अनभिज्ञता आणि उदासीनता आहे. कर्करोगाविषयी एका बाजूला अशी उदासीनता असतानाच दुसर्‍या बाजूला मात्र त्याच्याविषयी प्रचंड भीती आणि दहशत आहे. एकदा कोणता तरी कर्करोग झाला की त्याला यमाचे बोलावणेच समजावे असे दहशतीपोटी मानले जाते. मात्र डॉक्टर मंडळी याबाबत असा सल्ला देतात की कर्करोगाचे निदान वेळेतच झाले तर त्याला यमाचे बोलावणे मानण्याचे काही कारण नाही.

आज जो मुलगा पाच वर्षांचा आहे तो मुलगा त्याच्या प्रौढ वयात कर्करोग झाला तरीही ७१ वर्षापर्यंत निरामय आयुष्य घालवू शकतो असे तज्ञांचे मत आहे. मात्र असे असले तरीही कर्करोग होऊ नये यासाठी काही काळजीही घेता येऊ शकते. कर्करोग कशाने होतो हे अजूनही निश्‍चितपणे सांगता आलेले नाही. परंतु काही सवयी टाळल्या तर कर्करोगापासून दूर राहता येऊ शकते. आज पाश्‍चात्य देशामध्ये तर असे खात्रीशीररित्या सांगितले जात आहे की ज्या व्यक्तीला तरुण वयामध्ये रक्तदाब किंवा मधूमेह झालेला नसेल ती व्यक्ती कर्करोगातून बचावल्यानंतरही १०० वर्षे जगू शकते.

कर्करोग हा भयंकर रोग मानला जातो. रक्तदाब किंवा मधूमेह यांच्याबाबतीत मात्र तेवढी भीती बाळगली जात नाही. खरे म्हणजे रक्तदाब दुरूस्त होत नसतो. मधूमेहसुध्दा दुरूस्त होत नाही. पण दुरूस्त न होणारे विकार आता लोकांना फारसे घबराटीचे वाटत नाहीत. त्यांना सोबत घेऊन लोक दीर्घकाळ जगू शकतात. दुरूस्त न होणार्‍या विकारांबाबतीत आपली भीती कमी झालेली आहे. मात्र दुरूस्त होणार्‍या कर्करोगाविषयीची भीती अजून जात नाही. म्हणून लोकांनी कर्करोगासंबंधीचे वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कर्करोग हा प्रामुख्याने जीवनपध्दतीतून विकसित होणारा आजार आहे. तेव्हा प्रत्येकाने आपली जीवनपध्दती निरोगी ठेवली तर कर्करोग होण्याची भीती कमी होते. त्यासाठी तंबाखू, सिगारेट, दारू ही व्यसने टाळली पाहिजेत. नित्य नियमाने व्यायाम केला पाहिजे आणि शक्यतो आरोग्यास हितकारक असा आहार घेतला पाहिजे.