भारतीय रस्त्यावर पुन्हा धावणार ‘येजदी’


नवी दिल्ली: एकेकाळीत तरुणाईमध्ये ‘येजदी’ या मोटारसायकलची क्रेज होती. पण या गाडीचे प्रॉडक्शन काही कारणास्तव थांबवण्यात आले. जावा मोटर्सची ही मोटारसायकल होती. पण ही गाडी रॉयल इनफिल्डसमोर काही टिकाव धरू शकली नाही. पण आता तब्बल ४४ वर्षांनंतर जावाची गाडी भारतीय रस्त्यावर दिसणार आहे. आता या गाडीच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे हक्क महिंद्रा अॅन्ड महिद्रा या कंपनीने विकत घेतले असून ही जावा गाडी २०१८ मध्ये भारतातील रस्त्यावर उतरणार आहे.

जावा मोटारसायकल १९६०मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हा कर्नाटकच्या म्हैसूर शहरात आयडियल जावा (इंडिया) लिमिटेडने याला चेकोस्लाव्हाकियाची कंपनी ‘जावा मोटर्सकडून’ परवाना घेऊन उत्पादित केले. १९२९ मध्ये याची सुरुवात झाली होती. जवळपास १४ वर्षे भारतात जावाची निर्मिती झाली. १९७४मध्ये कंपनी बदलली आणि नवीन कंपनीने मॉडेलही बदलले. ती ‘येजदी’ नावाने नव्याने आली आणि १९९६मध्ये कंपनी बंद पडली.

या मोटारसायकलने या काळात भारतीय ग्राहकांची मन जिंकली. ७० ते ८० च्या दशकापर्यंत ही मोटारसायकल रॉयल एनफिल्डची प्रमुख स्पर्धक होती. तर आजही हिचा दबदबा युरोपात कायम आहे. ही गाडी आजही तेथे प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळेच झेक रिपब्लिकमध्ये ‘ऑल न्यू जावा’ सादर झाली आहे.

ही बाइक पूर्वी २ स्ट्रोक इंजिनसोबत येत होती. पण आता येणारी जावा ४ स्ट्रोक इंजिनची आहे. नव्या जावामध्ये रेट्रो फिल अद्याप ठेवला आहे. जावाचा रेट्रो लुक हे त्याच्या लोकप्रियतेचे महत्त्वाचे कारण ठरले होते. ७०च्या दशकातील हा रेट्रो लुक नव्या जावाच्या विक्रीस देखील वाढवेल असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment