राणीबागेच्या प्रवेश शुल्कामध्ये पेंग्विनमुळे दहापटीने वाढ


मुंबई : मुंबईच्या राणीच्या बागेत गेल्या दोन महिन्यात पेंग्विन पाहण्यासाठी लोकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. लोकांचा चांगला प्रतिसाद बघुन शिवसेनाही खुश झाली आणि पेंग्विनवरुन रणकंदन करणारे विरोधकही शांत झाले. पण आता शंभर रुपये ज्यांच्याकडे असतील त्यांनाच पेंग्विन दर्शन देणार असल्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबासोबत पेंग्विन पाहायला जाताना थोडा विचार करावाच लागणार आहे. कारण कित्येक वर्षे दोन आणि पाच रुपये असलेले या प्राणिसंग्रहालयाचे प्रवेश शुल्क शंभर रुपये करण्यात येणार आहे.

पेंग्विन पाहण्यासाठी पहिल्याच आठवड्यात आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. ४० हजार पर्यटक एकाच दिवसात आल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे राणीच्या बागेत प्रवेशासाठी शुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. पण ही वाढ दहापटीने वाढवून शंभर रुपये करण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांना केवळ पेंग्विन आल्यानेच एवढा भुर्दंड पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका निवडणुकीपूर्वी आणण्यात आला होता असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. तुर्तास हा प्रस्ताव बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत सोमवारी मंजूर करण्यात आला. तब्बल दोन दशकांनंतर ही दरवाढ होणार आहे.

Leave a Comment