बारामतीचा ‘वजनदार’आंबा


बारामती : बारामतीमधील मळदयेथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला असून येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे.

बाजारातून आणलेल्या आंब्याची कोय हनुमंत बिचकुले यांनी शेताच्या बांधावर साडेपाच वर्षांपूर्वी लावली होती. या झाडाचे यंदाच्या वर्षी हे दुसरे पीक असून या झाडाला मागील वर्षी केवळ दोन ते तीनच फळे आली होती. पण यंदा झाडावर १५ ते १६ आंबे आले आहेत. सर्व फळे मोठी आहेत. या परिसरात रविवारी वादळी पाऊस झाला. या झाडाचे या पावसात सर्वात मोठे फळ पडले. या फळाचे वजन केले असता २ किलो ४०० ग्रॅम भरले. हे आंब्याचे झाड नैसर्गिक पद्धतीने वाढवले आहे.

कोणतेही खत किंवा औषध या झाडावर फवारले नाही, अशी माहिती हनुमंत बिचकुले यांनी दिली. माळेगाव येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी या फळाची कीर्ती ऐकून बिचकुले यांच्या शेताला भेट दिली. तसेच आंब्याच्या झाडाची व फळाची तपासणी केली. झाडाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. दोन महिन्यांत या झाडाचे कलम करण्यात येईल.

Leave a Comment