मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत इस्त्रायलची खतरनाक शस्त्रे म्हणजे विविध प्रकारच्या बंदुका मध्यप्रदेशातील मालनपूर येथील कारखान्यात बनविली जाणार आहेत. छोटी शस्त्रे उत्पादन करणार्यानया खासगी कारखान्यात अत्यंत घातकी इस्त्रायली बंदुका तयार केल्या जाणार असून त्या केवळ भारतीय लष्कराचीच नाही तर जगातील लष्करांची गरज भागविणार आहेत. पुंज लॉईड व इस्त्रायल शस्त्र उद्योग यांच्या परस्पर सहकार्यातून हे शक्य झाले आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल विपिन रावत यांनी नुकतेच देशासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनात तयार होत असलेले नवे धोके लक्षात घेऊन लष्करात आणखी मोठी गुंतवणूक होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते त्या पार्श्वभूमीवर इस्त्रायली शस्त्रनिर्मितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या बंदुकांच्या निर्मितीमुळे भारतीय लष्कराची क्षमता प्रचंड वाढणार आहे.
भारतात बनणार इस्त्रायली खतरनाक बंदुका
या निर्मितीअंतर्गत टेवर, नेगेव्ह लाईट मशीन गन, गलील स्नीपर, एक्स ९५ व एसीई असॉल्ट या बंदुका तयार केल्या जात आहेत. पैकी टेवर लाईट मशीनगन इस्त्रायलप्रमाणेच भारत, अमेरिका व जगातील अन्य लष्करांकडून वापरली जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करताना तिचा वापर केला गेला होता. नेगेव्ह लाईट मशीनगन लक्ष्याच्या अचूक वेध घेणारी हलकी मशीनगन आहे. इस्त्रायल १९९७ पासून त्या वापरत आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत भरवशाचे हत्यार असा तिचा लौकीक असून ती ऑटोमोडमध्येही वापरता येते. भारतीय लष्कराकडेही या मशीनगन्स वापरात आहेत.
गलील स्निपर १ किमी दूरवर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारी हलकी छोटी गन असून काँबॅट युनिटसाठी ती अतिशय उपयुक्त आहे. सेमी ऑटेामेटिक फिचरसह असलेली ही गन वापरात असताना अतिशय स्टेबल राहते. रॉ, स्पेशल फ्रंटिअर फोर्स, भारतीय लष्करात तिचा वापर केला जात आहे. एक्स ९५ हिची ओळख मायक्रो टेवर अशी आहे.जगातील हे एक मेव थ्री कॅलिबर वेपन आहे. असॉल्ट रायफल, कार्बाइन व सब मशीनगन प्रमाणे तिचा वापर करता येतो. जंगली भागात तसेच शहरी भागात व्हीआयपी सिक्युरिटीमध्ये, एनएसजी कमांडो तसेच एसपीजी दलांसाठी ती फार उपयुक्त आहे. कोबरा कमांडो नक्षली भागात कारवाई करताना तिचा वापर करतात. एसीई असॉल्ट मध्ये तीन साईजची काडतुसे वापरता येतात व जगभरातील लष्करांची या गन्स प्रथम पसंती आहे.