४० मोठ्या कर्जबुडव्यांची यादी जाहीर करणार रिझर्व्ह बँक


नवी दिल्ली: मद्यसम्राट विजय माल्ल्या देशातील बँकांना १२ हजार कोटी रुपयांचा चुना लावून भारतातून पळून गेला. माल्ल्या सोबतच असे अनेक बडे व्यावसायिक आहेत ज्यांच्यावर हजारों कोटींचे कर्ज आहे. पण या उद्योगपतींकडून कर्जाची परतफेड काही होत नसल्यामुळे रिजर्व बँक ऑफ इंडिया आणि त्यांच्याशी सलग्न असलेल्या बँका आता कर्जवसूलीसाठी कर्जबुडव्यांची यादी तयार करीत आहेत. ही यादी ४० जणांची असणार आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

अलीकडेच भारतातील कर्जबुडव्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कर्ज वसुलीच्या कामाकरिता प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला देणारा कायदा अध्यादेशाद्वारे देण्यात आला आहे. यासंबंधात ज्या कर्जबुडव्यांनी कर्ज परतफेड केलेली नाही, त्यांची यादी बनवून त्यांच्याकडून कर्जवसुली कशी करता येईल, त्या अनुषंगाने संबंधित बँकांद्वारे ही कारवाई केली जाईल. त्यासाठी एक समिती नियुक्त करण्याचे अधिकारही देण्यात आले असून तशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

बड्या कर्जदारांकडून कर्जवसुली करण्याचा हा एक नवा प्रयोगच आहे. हे काम ज्यांना पूर्णत्वास नेता आलेले नाही, अशांसाठी असून या कर्जदारांना मार्गावर आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत. बुडित कर्जाची ही समस्या वरच्या २०-३०-४० खात्यांमध्ये असून एक तर या लोकांनी एकत्रितपणे उद्योगात हे पैसे लावावे वा एकंदर या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे गरजेचे आहे, असे दिसून येते, अशी टिप्पणीही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Leave a Comment