लालूप्रसाद अडचणीत


भारतातले बहुसंख्य पुढारी ढोंगीच असतात. विशेषतः देशातल्या निवडणुका जसजशा महाग होत चालल्या आहेत तसतसे पुढारी जास्त पैसे कमावण्यासाठी पुन्हा पुन्हा नव्या नव्या ढोंगांचा आधार घेत आहेत. अशा ढोंगी पुढार्‍यांची यादी करायची झाली तर त्यात पहिले नाव कोणाचे घ्यावे याची यादी करताना लालूप्रसाद यादव हे नाव अगदी पहिल्यांदाच घ्यावे लागेल. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून १५ वर्षे काम केले आणि बिहारचे अक्षरशः जंगल करून टाकले. त्यांच्या काळात बिहारमध्ये जंगलचा कायदा चालत होता. म्हणून आज त्यांच्याच मदतीने मुख्यमंत्री झालेले नितीशकुमार लालूप्रसादांच्या कारकिर्दीत बिहारला जंगलराज असे म्हणत असत. या जंगलराजमध्ये लालूप्रसाद सरकारी तिजोरीमध्ये भरपूर चरले. माणसाने खावा असा चारा पुरला नाही म्हणून की काय त्यांनी जनावरांच्या चार्‍यातसुध्दा पैसे खाल्ले आणि भ्रष्टाचाराच्या इतिहासामध्ये गाजलेल्या खटल्यातील चारा घोटाळा उघड झाला. या चारा घोटाळ्यात १९९० पासून २०१३ पर्यंत कोर्टबाजी रंगत गेली. शेवटी २०१३ मध्ये उच्च न्यायालयात त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली.

नेमका त्याचवेळी भ्रष्ट नेत्यांच्या संदर्भातला नवा कायदा मंजूर झाला होता. एखाद्या राजकीय नेत्याला एक वर्षाची किंवा एक वर्षापेक्षा अधिक कालावधीची कैदेची शिक्षा सुनावली गेली की आधी त्याने त्याचे आमदार किंवा खासदार पद सोडले पाहिजे असा नवा कायदा झाला आणि या कायद्यानुसार लालूप्रसाद यादव यांना आपले खासदारपद सोडावे लागले. तेव्हापासून ते आमदार किंवा खासदार नाहीत. रांची उच्च न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावतानाच एक दिलासा दिला होता. लालूप्रसाद यांच्याविरोधात चारा घोटाळा प्रकरणात ६ गुन्हे दाखल झाले होते. हे सहाही गुन्हे एकाच प्रकरणातील होते आणि त्यातील साक्षीदार समानच होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्यांना एका खटल्यात शिक्षा सुनावून बाकीच्या पाच खटल्यातून दिलासा दिला होता. एकाच प्रकरणातील एका खटल्यात शिक्षा झाल्यानंतर पुन्हा उर्वरित खटले चालवण्यात काही अर्थ नाही असे म्हणून रांची उच्च न्यायालयाने लालूंच्या विरोधातले उर्वरित पाच खटले रद्द केले होते. लालूप्रसाद यादव यांच्याविरुध्द खटला भरणार्‍या सीबीआयला रांची उच्च न्यायालयाचा हा निकाल मान्य नव्हता. त्यांच्या विरोधातले सहा खटले वेगवेगळे चालवले गेले पाहिजेत अशी सीबीआयची मागणी होती. म्हणून सीबीआयने उच्च न्यायालयाच्या या निकालाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सर्वोच्च न्यायालयाने लालूंना मिळालेला दिलासा काढून घेतला. सीबीआयचे म्हणणे मान्य केले आणि उर्वरित पाच खटले पुन्हा चालवावेत असा निकाल दिला. आत लालूंच्या विरोधात आणखी पाच खटले चालतील. त्यातल्या कोणत्याही खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्त होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. कारण या सर्व सहा खटल्यातले साक्षीदार आणि पुरावे तेच ते आहेत आणि या पुराव्यांच्या आधारावर लालूंना एका खटल्यात शिक्षा झालेली आहे. म्हणजे हे पुरावे आणि साक्षीदार लालूंना अडकवणारे आहेत आणि त्यांच्याच आधारे उर्वरित पाच खटले चालणार आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लालूंना जेलची यात्रा घडण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव हे एवढ्या मोठ्या प्रकरणातील आरोपी असूनसुध्दा उजळमाथ्याने जणू काही महात्मा गांधींचे अवतार आहेत अशा आविर्भावात राजकारणात वावरत होते आणि त्यांचा बिहारमध्ये एक ठराविक मतदार असल्यामुळे विविध राजकीय पक्ष त्यांच्याशी ते भ्रष्टाचार असूनही तडजोड करत होते. त्यामुळे करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात गुंतलेले असूनही लालूप्रसाद यादव २०१३ पर्यंत विविध पदे भोगत राहिले आणि त्या पदांचा लाभ घेत राहिले.

त्यांनी आपल्या पत्नीला मुख्यमंत्री केले. मुलीला खासदार केले आणि त्यांची दोन मुले आता बिहारच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यातल्या एका मुलाला मुख्यमंत्री करण्याची स्वप्ने ते पहात आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द झालेले असतानाही लालूप्रसाद रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत राहिले होते. भ्रष्टाचार आणि राजकारण यांची आपल्या देशात कशी युती झालेली आहे. याचे भीषण दर्शन लालूप्रसाद यांच्या रूपाने घडत आहे. त्यांना खालच्या न्यायालयाने शिक्षा दिली असली तरी वरच्या न्यायालयात अपील केलेले आहे त्यामुळे जोपर्यंत वरचे न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत ते गुन्हेगार ठरत नाहीत असा युक्तिवाद करून डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांना रेल्वेमंत्री केले होते. कॉंग्रेसने लालूप्रसाद यांना नेहमीच आरोपी असूनही गोंजारले आणि आता नितीशकुमार यांनी लालूूंचा हात धरून सत्ता मिळवली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या बाबतीत खरोखर कठोरपणे कोण वागले असेल तर ते आय. के. गुजराल. गुजराज पंतप्रधान असतानाच लालूप्रसाद यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे नैतिकतेची बूज राखून लालूप्रसाद यादव यांनी राजीनामा द्यावा असा आदेश गुजराल यांनी दिला. परंतु तो आदेश न मानता लालूंनी आपले १२ खासदार घेऊन सरकारमधून बाहेर पडून आपला राजद हा पक्ष स्थापन केला. इंद्रकुमार गुजराल यांनी राजकीय तडजोड न करता लालूप्रसाद यांच्याबाबतीत कठोर भूमिका घेतली. पक्षात पडणारी फूट स्वीकारली पण भ्रष्ट लालूंसमोर गुडघे टेकले नाहीत. गुजराल यांनी जो कणखरपणा दाखवला तो मनमोहनसिंग दाखवू शकले नाहीत. त्यामुळे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असताना लालूप्रसाद नावाचा जोकर भारतीय राजकारणात हैदोस घालत गेला. आता मात्र त्यांच्यापुढे मोठेच आव्हान उभे आहे.

Leave a Comment