रामाच्या बहीणीचे, देवी शांताचे मंदिर


एकबाणी, एकपत्नी व एकवचनी राम हा जाणता राजा होता व भारतात अनेक ठिकाणी राम लक्ष्मण सीता यांची देव म्हणून पूजा केली जाते. रामाला तीन भाऊ होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण रामाला एक बहीणही होती याची माहिती फारच थोड्यांना असेल. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे रामाची बहीण देवी शांता हिचे मंदिर आहे. या मंदिरात ती आपले पती ऋषी श्रृंग यांच्यासोबर विराजमान आहे. देशभरातून दूरदूरून भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कुल्लू पासून ५० किमी अंतरावर हे मंदिर आहे.

शांता ही दशरख व कौसल्या यांची मुलगी हेाती म्हणजे रामाची ती बहीण. मात्र तिला अंगदेशाचा राजा रोमपद याला दत्तक दिली होती. रोमपदची पत्नी वर्षिणी ही कौसल्येची बहीण म्हणजे रामाची मावशी होती.शांतादेवी संदर्भात तीन कथा सांगितल्या जातात. राजा रोमपद याला अपत्य नव्हते व ते अयोध्येला आले असताना राणी वर्षिणीने चेष्टेने तुझे अपत्य मला दे अशी मागणी केली तेव्हा राजा दशरथाने शांता देवीला त्यांच्याकडे सोपविले व ती अंगदेशाची राजकुमारी बनली. ती वेद, कला, शिल्पशास्त्रात निपुण होतीच पण अत्यंत सुंदर होती.

दुसरी कथा सांगतात की तिच्या जन्मानंतर अयोध्येत १२ वर्षे दुष्काळ पडला. हा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर त्याने तिची रवानगी मावशीकडे केली व शांता परत कधीच अयोध्येला आली नाही. तिसरी कथा सांगतात, राजा रोमपद शांतेशी खेळण्यात मग्न असताना एक ब्राह्मण पावसाळ्यातील शेतीकामासाठी राजाची मदत मागण्यास आला पण राजाने त्याच्या कडे दुर्लक्ष केल्याने तो परत गेला. त्यामुळे रागावलेल्या इंद्राने तेथे पाऊस पाडलाच नाही. शेवटी श्रृंग ऋषींनी त्यावर उपाय म्हणून यज्ञ केला. पाऊस पडला. खूष झालेल्या राजाने शांतेचा विवाह या ऋषींबरोबर करून दिला. तिचे मंदिर तिच्या पतीसह बांधले गेले.

Leave a Comment