भारताचे जाँबाज कमांडो दल मार्कोस


भारताच्या मार्कोस या कमांडो दलाबद्दल बाहेर फारच थोड्यांना माहिती आहे. अतिशय कडक प्रशिक्षण पूर्ण करून व खास करून समुद्रावरील ऑपरेशन्ससाठी तयार केलेले हे कमांडो म्हणजे भारतीय लष्कराचे वैभव मानले जाते. अमेरिकेच्या नेव्ही सील प्रमाणे मरीन कमांडो फोर्स म्हणजेच मार्कोस यांना प्रशिक्षित केले जाते. हे कमांडो मुंबईवरील २६/११ च्या ऑपरेशनमध्येही दिसले होते. आपल्या खास युनिफॉर्मबरोबरच अजोड कामगिरी बजावण्यासाठी हे कमांडो प्रसिद्ध आहेत. भारतीय जवान जगातील अन्य देशांच्या लष्कराच्या तुलनेत कोठेही कमी नाहीतच कारण त्यांनाही उच्चस्तरीय प्रशिक्षण दिले जात असते.

जगभरातील स्पेशल कमांडो फोर्ससह या कमांडोचा संयुक्त सराव नेहमी सुरू असतो. १९८७ मध्ये समुद्री लुटारू, चाचे व दहशतवाद्यांना मुंडतोड जवाब देण्यासाठी या पथकाची स्थापना केली गेली. या गटात नुसती निवड होऊन भागत नाही तर कठीण प्रशिक्षणातूनही पार व्हावे लागते. साधारण २० च्या वयोगटातील जवानांना प्रथम पसंती दिली जाते व त्यानंतर त्यांना अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.

डेथ क्रोल म्हणजे मांडीपर्यंत येणारया चिखलातून खाद्यांवर २५ किलोची बॅग घेऊन धावणे, अडीच किलोमीटरची अडथळा रेस, हाय अल्टीट्यूड लो ओपनिग(एचएएलओ) म्हणजे ११ किमी उंचीवरून पॅराशूट जंप करणे व जमिनीजवळ येताच पॅराशूट उघडणे, एचएएचओ म्हणजे ८ किमी उंचीवरून जंप मारणे व १० सेकंदात पॅराशूट उघडणे अशा प्रशिक्षणाचा त्यात समावेश असतो. संपूर्ण पाण्याखालून पोहत जाऊन शत्रूचा किनारा गाठणे तसेच चाकूपासून ते अत्याधुनिक हँड गन मशीन गन्स वापरण्याचे प्रशिक्षणही त्यांना दिले जाते.

हे कमांडो सर्वसामान्य गर्दीपासून नेहमीच दूर व आपली ओळख लपवून असतात. त्यांच्या कुटुंबियांनही त्यांच्या कामाची माहिती दिली जात नाही. १९९९ च्या कारगिल युद्धात या कमांडोनी लष्कराला मोठी मदत केली होती.

Leave a Comment