योगशिक्षिका – वय अवघे ९७ वर्षे


तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे चालवल्या जाणार्‍या योग क्लासेसच्या संचालिका नानम्मल या ९७ वर्षांच्या असून अजूनही दररोज एक तास योगासने करतात. योगासने नित्य नेमाने करण्याने प्रकृती उत्तम राहते आणि विशेष करून महिलांना अनेक प्रकारच्या विकारांपासून दूर ठेवते असा त्यांचा दावा आहे. नानम्मल यांचे वय आज ९७ वर्षे असूनही त्यांची प्रकृती अगदी निकोप आहे. त्यांना योगाचे शिक्षण त्यांच्या आजोबांनी दिले आणि आजोबांच्या प्रेरणेने त्या वयाच्या तिसर्‍या वर्षापासून आजपर्यंत जवळपास ९५ वर्षे नित्यनेमाने योगासेन करत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज कोईम्बतूरमध्ये अनेक महिला योगासनांचा नित्य अभ्यास करत आहेत आणि निरामय जीवन जगत आहेत. नानम्मल ह्या केवळ महिलांसाठीच केवळ योगाचे वर्ग चालवतात.

नानम्मल यांना सहा मुले झालेली आहेत. मात्र त्यांची सहा बाळंतपणे घरीच झालेली आहेत. ती अतीशय सहजतेनेही झालेली आहेत. त्यांना कधी सिझेरीयन सेक्शन ऑपरेशन कधी करावे लागले नाही. बाळंतपणासाठीच नव्हे तर अन्य कोणत्याही कारणाने नानम्मल आजी कधीही दवाखान्याची पायरी चढलेल्या नाहीत. आज वयाच्या ९७ व्या वर्षीसुध्दा त्या सगळ्या प्रकारची योगासने सहजतेने करतात. त्यांना सहा मुले आहेत. नातवंडे, पतवंडे मिळून ३६ जण त्यांच्या कुटुंबात आहेत. एक पुरुष शिकला तर तो स्वतः शहाणा होतो. परंतु एक बाई शिकली तर ती कुटुंबाला आणि समाजाला शिक्षित करते. नानम्मल यांनी ही गोष्ट सिध्द करून दिली आहे आणि त्यांनी एक महिला योगासनाचा किती प्रभावी प्रचार करू शकते हे दाखवून दिले आहे.

त्यांच्या घरातली त्यांच्यापासूनची पाचवी पिढी म्हणजे पणपतवंडे हीसुध्दा योगासने करतात असे नानम्मल यांचे चिरंजीव बाळकृष्ण यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये असेच एक उदाहरण होते. ते म्हणजे डी. के. अय्यंगार यांचे ते ९४ वर्षे जगले आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत योगासने करत आणि शिकवत गेले. परंतु अय्यंगार पुण्यात रहात होते म्हणून त्यांची कीर्ती सार्‍या जगात गेली. नानम्मल या मात्र प्रसिध्दपासून तुलेनेने दूर राहिलेल्या आहेत. मात्र योगामुळे आपण शतायुषी होऊ असा त्यांचा विश्‍वास आहे. अजून तरी रक्तदाब किंवा मधूमेह यापासून त्या दूर आहेत आणि तीन वर्षात त्या शंभरी गाठतील तेव्हाही आजसारख्याच ठणठणीत असतील असा विश्‍वास त्यांना वाटतो.

Leave a Comment